नाशिक : नाशिकच्या संघवी कॉलेजमधील कॉम्प्युटर इंजिनीयरिंगच शिक्षण घेणाऱ्या तिन विद्यार्थिंनींनी महिलांचं चेंजिंग रुममधील छुप्या कॅमेऱ्यापासून संरक्षण व्हावं यासाठी एक नवीन सॉफ्टवेअर तयार केलं आहे. ज्यामुळे महिलांना शॉपिंग मॉल्समध्ये कपड्यांची ट्रायल घेण्यासाठी चेंजिंग रुमची गरजच भासणार नाही. त्यामुळेच हे अप सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतं आहे.


नाशिकमधील महावीर एज्युकेशन संस्थेच्या संघवी कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग मध्ये कॉम्प्युटर इंजिनीयरिंगच शिक्षण घेणाऱ्या प्राजक्ता जगताप, कांचन मते आणि शितल भोळे या तीन विद्यार्थिनी सध्या कॉलेज मध्ये सर्वत्रच चर्चेचा विषय ठरत आहेत. त्याला कारण ठरलंय ते म्हणजे त्यांनी तयार केलेलं 'व्हर्च्युअल ड्रेसिंग रुम' नावाचं सॉफ्टवेअर. शॉपिंग मॉल्स मधील महिलांच्या चेंजिंग रुम मध्ये छुपे कॅमेरे लावून त्यामार्फत अनेक गैरप्रकार केले जातात, आजवर तशा अनेक घटना या समोरही आल्या आहेत आणि याच घटनांवर आळा बसवण्यासाठी या मुलींनी चक्क चेंजिंग रुमलाच हा नवीन पर्याय शोधलाय.

हे सॉफ्टवेअर Dot net लँग्वेजमध्ये तयार करण्यात आले आहे. हे बनवण्यासाठी त्यांना वीस हजार रुपये एवढा ख़र्च तर 9 महिन्यांचा कालावधी लागला आहे. हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर त्याला कायनेट नावाचा एक डिव्हाईस बॉक्स जोड़ला जातो, जो सेन्सर म्हणून काम करतो. त्यानंतर व्हर्च्युअल ट्रायल करताना सेन्सर समोर उभे राहून व्हर्च्युअल इमेज कैप्चर केली जाऊन आभासी चित्र आपल्याला समोर कॉम्प्युटर वरील स्क्रीनवर दिसते. लवकरच या सॉफ्टवेअरच पेटंट देखील मिळणार असून विद्यार्थिनीनी तयार केलेल्या या अनोख्या प्रोजेक्ट बद्दल शिक्षकांकडून देखिल समाधान व्यक्त केल जातं आहे.

इतर कुठेही शॉपिंग करण्यापेक्षा वेगवेगळ्या व्हरायटीज शॉपिंग मॉल्समध्ये एकाच ठिकाणी मिळत असल्याने महिलावर्ग शॉपिंग मॉल्समधून कपडे खरेदी करायला पसंती देतात. मात्र चेंजिंग रुममधील या प्रकारच्या मागील काही घटना बघता चेंजिंग रुम महिलांना असुरक्षित वाटू लागल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिलाच आता पुढे आल्या आहेत. संघवी कॉलेजच्या या विद्यार्थिनींनी केलेला हा प्रोजेक्ट नक्कीच कौतुकास्पद आहे, तसंच तो एक चांगला पर्याय देखिल आहे.