मनमाड : कर्जाला कंटाळून विद्युत वितरण कंपनीच्या डीपीवर चढून हातात विजेची तार धरत शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. नाशिकमधील चांदवड तालुक्यातील बोराळेत ही घटना घडली आहे.


32 वर्षांच्या आप्पासाहेब खंडेराव जाधव या तरुण शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचललं. जाधव यांनी बोराळे येथील विविध विकास सोसायटींकडून 2010 साली 50 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कर्जाची रक्कम अद्यापही न फेडल्याने सोसायटीने त्यांना 50 हजार रुपये आणि त्यावरील व्याज अशी एकूण 78 हजार 950 रुपयांच्या जप्तीची नोटीस 22 मार्च 2017 रोजी पाठवली होती.

सततची नापीकी, शेतीमालाला कवडीमोल भाव, यामुळे कर्ज कसं फेडायचं, या चिंतेत आप्पासाहेब पडले होते. त्यातच थकबाकी वसुलीसाठी सोसायटीने जप्तीची पाठवलेली नोटीस यामुळे हा शेतकरी हादरुन गेला होता.

या चिंतेतून त्यांनी बोराळे ग्रामपंचायतीच्या गट नं. 81 मध्ये असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या डीपीवर चढून विजेची तार हातात धरत आत्महत्या केली. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.