नाशिक : जातपंचाच्या दबावाला बळी पडून मुलीला संपवणाऱ्या बापाला फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे. नाशकात 2013 साली घडलेल्या या प्रकरणानं महाराष्ट्र सुन्न झाला होता.


ज्या पद्धतीनं बापानं पोटच्या मुलीची हत्या केली, ते पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. ऑनर किलिंग प्रकरणात न्यायालयानं दिलेला हा निकाल सर्वात मोठा आणि महत्वाचा ठरला आहे.

प्रमिला कुंभारकर... रुढी-परंपरांना न जुमानता तिनं आंतरजातीय विवाह केला.. जातीयतेची वेस ओलांडणाऱ्या प्रमिलाला आता कुठे सुखी संसाराची स्वप्न पडू लागली होती.. आपल्या उदरात तिनं नऊ महिन्यांचं बाळही वाढवलं. 28 जून 2013... ज्या दिवशी प्रमिलाचा वाढदिवस होता, त्याच दिवशी तिच्या बापानंच तिचा जीव घेतला..

कारण काय, तर प्रमिला कुंभारकर लग्नानंतर प्रमिला कांबळे झाली होती...आणि जातपंचांच्या जाचानं तिच्या माहेरच्यांचं जगणं मुश्किल केलं होतं.

पोटात बाळ असणाऱ्या प्रमिलाला घेऊन लोकांनी दवाखाना गाठला. एकीकडे अनोळखी लोक तिच्या जीवासाठी धडपडत होते. आणि दुसरीकडे संवेदना हरवलेला तिचा बाप मात्र टपरीवर चहा आणि सिगारेट पित बसला..

बेड्या पडल्यानंतरही गेंड्याच्या कातड्याच्या एकनाथ कुंभारकरला कणभरही फरक पडला नाही. उलट ती जिवंत असेल तर मी तिला पुन्हा मारतो, असं तो म्हणाला.. त्याच्या या वाक्यानं पोलीसही चक्रावले..

या घटनेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं राज्यभर जातपंचायतींच्या विरोधात लढा उभा केला. ज्याठिकाणी प्रमिलाची हत्या झाली, तिथली माती घेऊन अंनिसच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढलं.. आणि जात बहिष्कृत कायद्याच्या निर्मितीला निमित्त मिळालं..

आज प्रमिलाच्या बापाला फाशीची शिक्षा झाली असली तरी समाज जातीयतेचा दोरात घट्ट आवळला गेला आहे. अकराव्या शतकापासून प्रबोधनाचा वसा सांगणारा महाराष्ट्र अजून अशा किती प्रमिलांचा बळी देईल, हाच एक दुर्देवी प्रश्न आहे...