नाशिक : नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी पालिकेच्या अधिकाऱ्याला दणका दिला आहे. तुकाराम मुंढे यांनी आज (शुक्रवार) पालिकेत एक बैठक बोलावली होती. याच  बैठकीत गणवेश परिधान करुन न आलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला त्यांनी थेट बैठकीतून बाहेर काढलं.

तुकाराम मुंढे हे आपल्या शिस्तशीर कारभारासाठी प्रसिद्ध आहेत आणि याचा प्रत्यय नाशिक महापालिकेतील अधिकाऱ्यांना पहिल्याच दिवशी आला.

तुकाराम मुंढे यांनी बोलवलेल्या पालिकेतील बैठकीला अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल महाजन हे आधीच उशिरा पोहचले. त्यातही ते गणवेश परिधान न करुन आल्याने त्यांना गणवेश घालून येण्याच्या सूचना देत बैठकीतून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर अनिल महाजन हे पंधराच मिनिटात गणवेश परिधान करुन पुन्हा बैठकीला हजर झाले.

दरम्यान, पहिल्याच दिवशी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या कारभाराची चुणूक दाखवल्यामुळे पालिकेतील अधिकारीही चांगलेच धास्तावले आहे.

तुकाराम मुंढे नाशिक पालिका आयुक्तपदी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या कारभारात सुसूत्रता यावी, रखडलेली कामं मार्गी लागावीत, यासाठी डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढेना जाणीवपूर्वक नाशिकला पाठवण्यात आल्याचं बोललं जात आहे.

शहरातील इमारतीच्या कपाटाचा प्रश्न, शेकडो कोटींच्या रस्ते डांबरीकरणाचा विषय, एलईडी बसवण्याचा वादग्रस्त प्रस्ताव, स्मार्ट सिटी स्पर्धेत टिकून राहण्याचे आव्हान, गोदावरी प्रदूषण यासारखे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचं आव्हान मुंढेंसमोर आहे. त्यामुळे ते कुठल्या विषयाला हात घालतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, मुंढे यांची याआधी नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन पुण्यात पीएमपीएमएलच्या अध्यक्ष आणि संचालकीय व्यवस्थापकपदी बदली करण्यात आली होती. नवी मुंबईप्रमाणेच पुण्यातही राजकारण्यांशी त्यांचे खटके उडाले.

नवी मुंबईत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता. राजकीय वातावरण तापल्यानंतर तुकाराम मुंढे यांची बदली पुण्यात करण्यात आली. तुकाराम मुंढे यांच्या शिस्तीचा फटका पुण्यातील राजकारण्यांनाही बसला. शिवाय कर्मचाऱ्यांनीही तुकाराम मुंढेंच्या कारभाराची धास्ती घेतली होती.

संबंधित बातम्या :

नवीन बदलाला दोन्ही बाजू असतात, विरोध होणारच : तुकाराम मुंढे


मुंढे नाशिक पालिका आयुक्तपदी, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले


तुकाराम मुंढे यांच्यासह राज्यातील सहा सनदी अधिकाऱ्यांची बदली