नाशिक : तुकाराम मुंढे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्याआधीच सोशल मीडियावर मुंढे फिव्हर बघायला मिळतोय. तुकाराम मुंढे यांच्या कामाचे गोडवे गायले जात असून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप अशा सर्वच माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

तुकाराम मुंढे यांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदावरुन बदली झाल्याने कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला आहे. तर नाशिक महानगरपालिकेतील अधिकारी आणि पदाधिकारी धास्तावले आहेत. मात्र सामान्य जनता नेहमीच तुकाराम मुंढे यांच्या मागे असते आणि त्यामुळेच नाशिकमध्येही त्यांच्या स्वागतासाठी सर्व जण उत्सुक असल्याचं सोशल मीडियातून दिसत आहे.

पीएमपीएमएलच्या संचालकीय व्यवस्थापक आणि अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज निर्णय घेतले. ज्यामुळे कर्मचारी नाराज होते. तर राजकारण्यांशीही त्यांचे खटके उडाले. अखेर त्यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

नाशिकचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी एबीपी माझाशी बातचीत केली. एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी त्यांना विविध मुद्द्यांवर बोलतं केलं. ''या बदलीकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो, मोठी जबाबदारी मिळाली आहे. इथल्या अनुभवाचा वापर करत नाशिकमध्येही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करु,'' असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.

संबंधित बातमी :

जिथे जिथे तुकाराम मुंढे, तिथे तिथे वाद, कशामुळे ते त्यांच्याच तोंडून ऐका