नाशिक : स्वप्नांना जिद्दीची साथ लाभली की विक्रम घडतोच आणि असाच विक्रम घडवलाय नाशिकच्या तन्वी चव्हाण-देवरे यांनी. लहानपणापासून पोहण्याची आवड असलेल्या तन्वी यांनी 42 किलोमीटरची इंग्लिश खाडी पार केली आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. दोन लेकरांची आई असलेल्या तन्वी यांच्या या स्वप्नपूर्तीच्या प्रवासासंदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट,


छंद जोपायचे असेल तर जिद्द आणि चिकाटी तितकीच महत्त्वाची असते. मात्र एखाद्या महिलेला एखादी साधी स्पर्धा खेळायची असेल तर तिला तिच्या आजूबाजूच्या वातावरणानुसार निर्णय घ्यावा लागतो. मात्र ती महिला जर विवाहित असेल तर तिच्या समोरचे आव्हान देखील तितकेच मोठी असतात. नाशिकच्या तन्वी चव्हाण-देवरे या विवाहित महिलेने एक अविस्मरणीय असा विक्रम आपल्या नावे केला आहे. जगातील सर्वात कठीण जलतरण स्पर्धा मानल्या जाणाऱ्या इंग्लिश चॅनेल पार करण्याची कामगिरी नाशिकच्या तन्वीने केली आहे. डोव्हर यूके ते फ्रान्स असे 42 किलोमीटरचे अंतर तन्वीने 17 तास 42 मिनिटात पूर्ण केले आहे. हा विक्रम करणारी तन्वी पहिली भारतीय आई बनली आहे.


लग्नानंतर पोहण्याचा छंद बाजूला


तन्वी देवरे यांना लहानपणापासून पोहण्याची आवड होती. मात्र शालेय जीवनात त्यांना स्वतःचा छंद जोपासत असताना अनेक कसरती कराव्या लागल्या. शिक्षणासोबत आपला छंद देखील तितकाच महत्त्वाचा असल्याची भावना तन्वी यांच्या मनात कायम असत. मात्र तन्वी यांचे लग्न झाले आणि आवड निवड हा पूर्ण भाग त्यांच्या आयुष्यातून दुरावला गेला. अर्थात त्यांचा पोहण्याचा छंद बाजूला गेला. 


तन्वी यांना दोन मुले असून त्या मुलांना सांभाळत त्यांनी तब्बल 18 वर्षानंतर पुन्हा आपला छंद जोपासायचा ठरवले. तन्वी यांनी पोहण्याच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग देखील घेतला. विविध पारितोषिक आणि बक्षीसही मिळवली. मात्र काहीतरी मोठं करण्याची गाठ त्यांच्या मनात कायम होती. 


अखेर धाडसी निर्णय घेतला


अखेर त्यांनी एक धाडसी निर्णय घेण्याच ठरवलं. जगातली सर्वात कठीण जलतरण स्पर्धा मानली जाणारी इंग्लिश चॅनेल अर्थात इंग्लिश खाडी पार करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. वडिलांची साथ मिळाली पतीचाही होकार मिळवण्यात तन्वी यशस्वी झाल्या. मात्र लग्नानंतर सासरची मंडळी नेमकी काय भूमिका घेणार या विवचनेत तन्वी होत्या. मात्र हळूहळू त्यांनी आपल्या सासूंना इंग्लिश खाडी याची माहिती दिली. अखेर त्यांचा प्रवास सुरू झाला तो इंग्लिश खाडी पूर्ण करण्यापर्यंत. 


अनेक अडथळ्यांवर मात करून आता परिश्रम घेत तन्वी देवरे यांनी यशस्वीरित्या इंग्लिश खाडी स्पर्धेत यश मिळवले. मात्र या यशामागे त्यांचे मार्गदर्शक प्रशिक्षक श्रीकांत विश्वनाथन यांचे परिश्रम ही तितकेच महत्त्वाचे होते. यात तन्वीचे पती हे देखील तन्वीला वेळोवेळी मार्गदर्शन करत होते आणि प्रोत्साहितही करत होते. 


तन्वीच्या या विजयामुळे भारतातील अनेक महिलांना विशेषता विवाहित महिलांना एक वेगळी प्रेरणा मिळाली. जिद्द आणि कठोर परिश्रम असेल तर कोणतेही आव्हान सहज पार केले जाऊ शकते आणि महिला सशक्तीकरणाचा धैर्याचा वारसा पुढे घेऊन जात असताना अंतरिम यश आपल्याला नक्कीच मिळते असे देखील तन्वी देवरेंच्या या विक्रमातून आपल्याला पाहायला मिळतंय.