नाशिक : शहरातील सिडको केवल पार्क येथे दोन गटातील वाद सोडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये पोलीस निरीक्षक सुनील पवार जखमी झाले आहेत. बांधकाम व्यावसायिक आणि जागा मालकाच्या नातलगांमध्ये झालेल्या वादात एका गटाने पोलिसांवरच हल्ला केला. या प्रकरणी सातहून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आणखी एका प्रकरणात एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याने नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. 


जागेच्या मालकीवरून वाद


नाशिक शहरातील सिडको परिसरात असलेल्या केवल पार्क परिसरातील गाडे मळा येथे दोन गटात बांधकामावरून वाद सुरू असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली. त्यानंतर नियंत्रण कक्षातील राखीव पोलीस घेऊन पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि उपनिरीक्षक सविता उंडे या घटनास्थळी दाखल झाल्या. या जागेवरून बांधकाम व्यावसायिक आणि जागा मालकाच्या नातलगांमध्ये वाद सुरू होता.


पोलिसांवरच हल्ला 


न्यायालयाच्या आदेशाने मनपा प्रशासनाच्या वतीने पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी आदेशित करण्यात आलेले मनपा कर्मचारी देखील या ठिकाणी दाखल झाले होते. मात्र दोन गटात झालेल्या वादात एका गटातील आठ ते दहा तरुणांनी पोलीस पथकावरच हल्ला चढवला. 


या हल्ल्यात पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्यावर एकाने चाकूने हल्ला केला तर उपनिरीक्षक सविता उंडे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात सात पेक्षा अधिक संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


एकीकडे शुक्रवारी सायंकाळी सिन्नर फाटा येथे एकावर हल्ला करून त्याचा खून करण्यात आला. तर दुसरीकडे पोलीस पथकावरच हल्ला झाल्याने आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.


ही बातमी वाचा: