नाशिक: केंद्र शासनामार्फत 19 नोव्हेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 'स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023' अभियान राबवण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशन (Clean India Campaign) (ग्रामीण) अभियानात लोकसहभाग वाढवणे, हागणदारीमुक्त अधिक घटकांबाबत जनजागृती करणे, गावागावांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा Clean Campaign) निर्माण करणे, गावांचा सहभाग वाढवणे हा उद्देश आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सर्व गावांनी 'स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023' मध्ये सहभागी होऊन स्वच्छतेची व्याप्ती वाढवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या (Nashik ZP) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
केंद्र शासनामार्फत सन 2018 पासून स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणची सुरुवात झाली आहे. दरवर्षी राबविल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये बदल करण्यात येऊन आता नव्या स्वरूपात 'स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण' हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक गाव स्वमूल्यांकनाद्वारे सहभागी होणार असून स्वच्छ सर्वेक्षण 2023 ची प्रक्रिया दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात 19 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत ग्रामपंचायतींचे स्वयंमूल्यांकन व पूर्व पडताळणी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 1 मे ते 15 ऑगस्ट 2023 पर्यंत जिल्हास्तरीय मूल्यांकन होणार आहे. ग्रामपंचायतींचे स्वयंमूल्यांकन व पूर्व पडताळणीमध्ये गावातील कुटुंब स्तरावरील आणि सार्वजनिक स्तरावरील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन व जाणीव जागृती क्षमता बांधणीअंतर्गत स्वच्छतेच्या घटकांच्या आधारे ई-ग्राम स्वराज्य पोर्टलवर ग्रामपंचायतीने प्रश्नावली भरून स्वयंमूल्यांकन करायचे आहे.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 चा मुख्य उद्देश जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा निर्माण करून ओडीएफ प्लस मॉडेल घटकाबद्दल समुदायांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त गावे ओडीएफ प्लस होण्यास मदत होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण हे 1500 गुणांचे असणार आहे. यामध्ये गाव स्वतः स्व- मूल्यांकन करणार असून, यासाठी 500 गुण आहेत. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन व गावातील दृश्यमान स्वच्छता व जनजागृती व क्षमता बांधणी या बाबींचा समावेश आहे. जिल्हास्तरीय मूल्यांकनासाठी 500 गुण असणार आहेत. यामध्ये सेवा स्तर पातळी प्रगती अंतर्गत ओडीएफ प्लस अंमलबजावणी संकेत स्थळावरील नोंदीनुसार व क्षमता बांधणी या बाबींचा समावेश आहे. थेट निरीक्षणासाठी 500 गुण असून यामध्ये कुटुंबस्तर, गावपातळीवरील व्यवस्था, सार्वजनिक स्तरावरील स्वच्छता या बाबींचे थेट निरीक्षण केंद्र शासनाकडून नियुक्त त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे.
उत्कृष्ट ग्रामपंचायतीचे जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर अशा तीन श्रेणीमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. 500 गुण, प्रत्यक्ष निरीक्षणासाठी ग्रामपंचायतींची स्वतंत्र पडताळणी मूल्यांकनामध्ये सेवा स्तर प्रगतीसाठी करण्यात येणार आहे. या अभियानात स्वच्छतेची व्याप्ती वाढवण्यासाठी ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग घेऊन घरगुती आणि सार्वजनिक स्तरावर सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापनअंतर्गत घटकांची कामे पूर्ण करून, स्वच्छतेबाबत जाणीव जागृती निर्माण करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
दरम्यान, याबाबत सर्व संबंधित यंत्रणेला सुचना देण्यात आल्या असून नाशिक जिल्हयात ग्रामपंचायतींची स्वयंमुल्यांकन भरण्याची कार्यवाही करण्यात येत असून यामध्ये राज्यात नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी दिली.