नाशिक : आजवर तुम्ही काव्य संमेलनात प्रेम कविता, राजकीय कविता अशा अनेक कविता ऐकल्या असतील. मात्र नाशिकमध्ये रविवारी चक्क रस्त्यावरील खड्डे या विषयावर पहिले काव्य संमेलन पार पडले असून या संमेलनाला 'स्मार्ट खड्डे काव्य संमेलन' असे नाव देण्यात आले होते. कवींनी या संमेलनाच्या माध्यमातून सरकार आणि महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरल्याचंही बघायला मिळालं.  


खड्डे झाले स्मार्ट गड्यांनो सेल्फी काढू चला, महापालिकेची काढा पालखी.. स्मार्ट सिटीच्या नावाखाली कायापालट नाशिकचा, यांच्या घरात भरली खोकी बाजार दिवाळखोरीचा, अशा कविता या संमेलनामधून सादर करण्यात आल्या. 


नाशिकच्या सीबीएस परिसरातील आयटक कामगार केंद्रच्या हॉलमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने हे 'स्मार्ट खड्डे काव्य संमेलन' आयोजित करण्यात आलं होतं. नाशिक शहरात जुलै महिन्यात पडलेल्या दोन पावसानेच मुख्य रस्ते आणि कॉलनी रस्ते अशा सर्वच रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडले असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झालीय. 


खड्यात साचलेल्या पाण्यामुळे खोलीचा अंदाज येत नसल्याने छोट्या मोठ्या अपघातातही वाढ झाली असून वाहनचालकांना वाहनं चालवतांना मोठी कसरत करावी लागतीय. विशेष म्हणजे यावर नागरिकांनी अनेक वेळा आवाज उठवूनही हा त्रास कमी होण्याचं नाव घेत नसल्याने नाशिकमधील स्थानिक लेखक आणि कवींनी एकत्र येत पहिल्यांदाच या आगळ्या वेगळ्या काव्य संमेलनाचे आयोजन केले होते. 
 
या संमेलनात सामाजिक कार्यकर्तेही सहभागी झाले होते. खड्ड्यांवर कविता करून महापालिका प्रशासन आणि राजकारण्यांना या संमेलनातून चांगलेच धारेवर धरण्यात आले. खड्डयांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहत या संमेलनाची सुरुवात झाली होती.


"नाशिककर खड्डयांना कंटाळले आहेत. आंदोलने करून पण महापालिका दखल घेत नाही. प्रशासन ढिम्म आहे. ही मोहीम हाती घेण्यात आली असून कवीही यात सामील झाले आहेत, उद्या ते ही रस्त्यावर उतरतील. खड्ड्याचे राजकारण सुरु झाले आहे. किती तुम्हला कमिशन भेटले ? हे पण नगरसेवकांना नागरिक पुढे विचारतील, असा इशारा संमेलन आयोजक राजू देसले यांनी दिला आहे. 


 रोजगार क्षम खड्डे असा मी तिरकसपणे लेख लिहिला होता. आपला जो संताप होता. लेखक कवी हा भाष्यकार असतो, आपण आता भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मी सांगितल्याने या कविता तयार केल्या गेल्या.. येग येग सरी, आमचे खिसे भरी, अशी माहिती  शंकर बोऱ्हाडे यांनी दिली.       


शहरात सुमारे सहा हजार खड्डे पडले असून यातील 60 टक्के बुजवल्याचा दावा महापालिका करते आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती ही बिकट असून नाशिक महापालिकेवर प्रशासक असलेल्या महापालिका आयुक्तांच्याच कारभारावर नाशिककर आणि कवींकडून तिव्र नाराजी व्यक्त केली जातीय.  


नाशिक शहरातील खड्ड्यांची समस्या ही एवढी गंभीर झाली आहे की या विषयावर चक्क काव्य संमेलनच भरवून महापालिकेला आंदोलनाचा इशारा देण्याची वेळ नाशिककरांवर आलीय त्यामुळे आता तरी महापालिकेवर प्रशासक म्हणून बसलेल्या महापालिका आयुक्तांना जाग येणार का ? आणि शहरवासीयांची खड्डयांच्या त्रासापासून मुक्तता होणार का ? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.