मालेगाव : शिक्षक म्हणजे समाजात उच्च आदर्श ठेवणारी व्यक्ती. शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांनाच घडवत नाही तर कुटुंब, समाज आणि राष्ट्र घडवण्याचं काम करतात. कोणत्याही देशाच्या किंवा समाजाच्या उभारणीत शिक्षणाची भूमिका महत्त्वाची असते. परंतु मालेगाव महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांनी या धारणेला तडा दिला आहे. गलेलठ्ठ पगार घेणारे खरे शिक्षक घरी बसून त्याऐवजी भाडोत्री शिक्षकांना शाळेवर पाठवत असल्याचं समोर आलं आहे.


मालेगाव महापालिकेच्या शाळेत भाडोत्री शिक्षकांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकाच्या उर्दू शाळेचे गलेलठ्ठ पगार असणारे शिक्षक गैरहजर राहतात आणि त्यांच्या बदल्यात दुसऱ्या शिक्षकांना वर्गावर पाठवतात. मुख्याध्यापकांच्या तासिकेवर जाणाऱ्याला महिन्याकाठी दोन हजार रुपये तर शिक्षकांच्या जागी ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्याला दीड हजार रुपये पगार कायम शिक्षकाकडून दिला जात होता. 


महापालिकाचे उपयुक्त राजू खैरनार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी मालेगावातील मनपा शाळा क्रमांक 47 ची पाहणी केली असता दोन भाडोत्री शिक्षक शिकवत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. या संदर्भातील अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जाणार आहे. किती दिवसापासून ही धूळफेक सुरु होती. अजून किती शाळांमध्ये असा प्रकार आहे याची माहिती घेतली जात आहे.


आयुक्त निर्णय घेतील : राजू खैरनार, उपायुक्त, मालेगाव मनपा
"शिक्षकांचा मेळाव्यात मी सांगितलं होती कायम शिक्षक स्वत: गैरहजर राहून भाडोत्री शिक्षकांना शिकवण्यासाठी वर्गावर पाठवतात अशा तक्रारी वारंवार येतात. अशा प्रकारामुळे महापालिकेची आणि स्कूल बोर्डची प्रतिमा मलिन होईल असं काही करु नका. शाळेत दोन भाडोत्री शिक्षक शिकवत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तपासणी करण्यासाठी मी अधिकाऱ्यांसोबत गेलो. तिथे भाडोत्री शिक्षकांद्वारे शिकवणी सुरु होती. याचा पंचनामा करण्यात आला. आता आयुक्तांसमोर अहवाल सादर केला जाईल आणि ते याबाबत निर्णय घेतील," असं मालेगाव महापालिकेचे उपायुक्त राजू खैरनार यांनी सांगितलं.


अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा गैरसमज : मुख्याध्यापक
दुसरीकडे शाळेचे मुख्याध्यापक रियाज अन्सारी यांनी हे आरोप फेटाळले असून अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा गैरसमज झाल्याचा दावा केला आहे. आमच्या शाळेत भाडोत्री शिक्षक नाहीत. आमचे शिक्षक दररोज आणि वेळेवर शाळेत येऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कर्तव्य पार पाडतात.