नाशिक : पाऊस आणि खड्डे हे समीकरण जणू दरवर्षी ठरलेलेच असते. पावसाला सुरुवात झाली की अनेक ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली बघायला मिळते. मात्र नाशिक-मुंबई महामार्गाची यंदा नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणावर दूरवस्था झाली असून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. प्रत्येक किलोमीटर अंतरावर छोटे-मोठे खड्डे नजरेस पडत आहेत. खास करुन वाडीवऱ्हे, घोटी, इगतपुरी, कसारा तसेच शहापूरजवळ तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते आहेत? असाच प्रश्न इथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला पडत आहे. पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. यासोबतच खड्ड्यात पाणीही साचल्याने या खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने वाहनांचं देखील मोठं नुकसान होत आहे. याशिवाय दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे रोज छोटे-मोठे अपघातही खड्ड्यांमुळे होत आहेत. रात्रीच्या वेळी तर या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे.


आग्र्याला जोडणाऱ्या या मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. नाशिक ते मुंबई प्रवासासाठी जिथे एरव्ही साडेतीन ते चार तास लागतात तेच अंतर कापण्यासाठी सध्या पाच ते साडेपाच तासांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करता आम्ही टोल का भरावा? असा संतप्त सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे वाहनांचे होणारे नुकसान लक्षात घेता या महामार्गावरुन महागड्या आणि लक्झरी कारने प्रवास करणे नागरिक टाळत आहेत. इथून ये-जा करण्यासाठी स्थानिक नागरिक तसेच शेतकऱ्यांचेही मोठे हाल होत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करुनही काही फायदा होत नसल्याचं इगतपुरी तालुक्यातील नागरिक सांगतात. तसंच दरवर्षीच या त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.



यंदा पाऊसही समाधानकारक झालेला नाही. यासोबतच लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवांची वाहने वगळता इतर वाहनांसाठी या मार्गावरील वाहतूकही बराच काळ बंद होती. मात्र तरीही परिस्थिती उद्भवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर सवाल विचारले जात आहेत. खड्डे पडताच याबाबत बातमी प्रसारित केली जाते किंवा एखाद्या राजकीय पक्षाकडून आंदोलनही छेडले जाते. याचा परिणाम म्हणून या रस्त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जाऊन कामं केल्याचा दिखावा केला जातो, मात्र काही दिवसांनी अवस्था जैसे थे बघायला मिळते. सध्या तर खड्डे बुजवण्यासाठी एक नवीन ट्रेंड सुरु झाला असून खड्ड्यांमध्ये चक्क पेव्हरब्लॉक टाकले जातात.


एकंदरीतच राष्ट्रीय महामार्गाची ही अवस्था बघता गाव खेड्यांमधील रस्त्यांची काय परिस्थिती झाली असेल याची कल्पना न केलेलीच बरी. सध्या तरी एखादी मोठी दुर्घटना किंवा अपघात होण्याआधी संबंधित विभागाने नाशिक-मुंबई महामार्गावरील हे खड्डे तातडीने बुजवणे गरजेचे आहे, यासोबतच सरकारने यावर काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना करणेही आवश्यक आहे.


Mumbai Nashik Highway Pothole | मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य