नाशिक : नाशिक आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. या दोन्ही महानगरांदरम्यान देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे धावणार आहे. नाशिक-पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरु करण्याची ही अनेक वर्षांची मागणी आता प्रत्यक्षात येणार असून लोहमार्गाच्या कामाला लवकरच मुहूर्त लागणार आहे. या रेल्वेमुळे नाशिक ते पुणे अंतर अवघ्या पावणे दोन तासात पार करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गात अनेक अडथळे येत असले तरी नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड रेल्वे धावणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून नाशिक पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी होत होती. अर्थसंकल्पत विषय चर्चेला यायचा मात्र पुढे काहीच होत नव्हते. आता हा सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प केंद्र, राज्य सरकार आणि वित्तीय संस्थांच्या भागीदारीतून उभा राहणार आहे. 16 हजार कोटींच्या या सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्पसाठी केंद्र राज्य सरकार 20-20 टक्के आणि वित्तीय संस्था 60 टक्के गुंतवणूक करणार आहेत. नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या मार्गाचा आढावा घेण्यात आला असून कॅबिनेटच्या मंजुरीला प्रस्ताव पाठवला जाणार आहे. त्यानंतर भूसंपादनाच्या कामाला सुरुवात होणार आहे.


235 किलोमीटरचा हा लोहमार्ग असणार आहे सेमी हायस्पीड रेल्वे बरोबरच सध्याची प्रवासी आणि मालगाडी धावण्यासाठी ही मार्गाची निर्मिती केली जाणार असून ब्रॉडगेज मार्गावर सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पहिल्यांदाच तयार केला जाणार आहे. पुणे, चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर, नाशिक असा हा मार्ग असून 24 थांबे असणार आहेत. यासाठी पुणे-नाशिकला अतिरिक्त रेल्वे स्थानकाची देखील निर्मिती केली जाणार आहे. नाशिक पुणे आणि नगर या तीन जिल्ह्यातून हा मार्ग असणार आहे. त्यात मळती मीडिया हब, मॉल्स माल वाहतूक टर्मिनल उभारले जाणार असून रोजगाराची निर्मितीही होणार आहे. पुणे ते हडपसर हा मार्ग एलिव्हेटेड (elevated) असणार आहे. हडपसर ते नाशिकमार्ग भूभागावर राहणार आहे. 235 किलोमीटरच्या या मार्गात 18 बोगदे प्रस्तावित आहेत. रेल्वे फटाकवर क्रॉसिंगची समस्या टाळण्यासाठी 41 उड्डाण पूल आणि 128 भुयारी मार्ग असणार आहेत. रेल्वेची प्रवास प्रतितास 200 ते 250 किलोमीटर प्रतितास इतका जलद गतीने होणार असल्यान अवघ्या पावणे दोन तासात नाशिक ते पुणे अंतर कापता येणार आहे. सेमी हायस्पीड रेल्वे वेगाने धावण्यासाठी अत्याधुनिक रचना असणारे 6 डबे सुरुवातीलाच असणार आहेत, त्यापुढे डब्यांची संख्या 12 ते 16 पर्यंत वाढवता येणार आहे. पादचाऱ्यांना रेल्वे मार्ग ओलंडता यावा यासाठी डर 750 मीटर अंतरावर रेल्वे मार्ग ओलंडण्याची व्यवस्था केली जाणार आहे.


नाशिक या धार्मिक नगरी ते विद्येचं माहेर घर असणाऱ्या पुणे शहराला जोडणारा सेतू ठरणार आहे. या रेल्वे मार्गाने केवळ प्रवास सुलभ होणार नाही तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी हा रेल्वे मार्ग महत्वाची भूमिका बजावणार आहे. नव्या रोजगाराची निर्मिती होणार असून कृषी औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. नाशिक-पुणे या दोन शहरांना जोडणारा थेट रेल्वे मार्ग नव्हता. एकतर कल्याणला वळसा घालून जावे लागायचे अन्यथा उडान योजनेचा बेभरवशाचा विमान प्रवास किंवा 210 किलोमीटरचा महामार्गचा प्रवास हे पर्याय दोन्ही शहरातील नगरिकांसाठी उपलब्ध होते. मात्र महामार्गाची रखडलेली कामं, खोळंबलेली वाहतूक अशा एक ना अनेक कारणाने दोन्ही शहराचा प्रवास नकोसा झाला आहे. म्हणूनच या नव्या रेल्वे मार्गाकडे दोन्ही शहरातील प्रवसी डोळे लावून बसले आहेत.


प्रकल्पाची वैशिष्ट्ये


* 235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग


* रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार


* रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग, पुढे हा वेग 250 किमीपर्यंत वाढवणार


* पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापणार


* वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पुरक प्रकल्प


* पुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानकांची आखणी


* 18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग प्रस्तावित


* प्रवासी आणि मालवाहतूक चालणार


* रेल्वे स्थानकात प्रकल्पबाधितांसह, स्थानिकांना व्यवसायांसाठी प्राधान्य


* प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार


* प्रकल्पाच्या खर्चात 60 टक्के वित्तीय संस्था, 20 टक्के राज्य सरकार, 20 टक्के रेल्वेचा वाटा


* कमी खर्चात प्रकल्प मार्गी लागणार


* विद्युतीकरणासह एकाच वेळी दोन्ही रेल्वे लाईनचे बांधकाम होणार


नाशिक ते पुणे अंतर आता अवघ्या दोन तासांवर; नाशिक ते पुणे दरम्यान हाय स्पीड ट्रेन धावणार