नाशिक : नाशिक शहरात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग केली जाणार आहे. मृत्यूनंतरची होणारी परवड थांबवण्यासाठी नाशिक महापालिका प्रशासनाने सुविधा ही उपलब्ध करून दिली आहे. यात शहरातील प्रत्येक स्मशानभूमीची सध्याची स्थिती काय आहे याबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे.


घरपट्टी, पाणीपट्टी सोबतच विविध विभागाची माहिती आणि तक्रारी करण्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध केल्यानंतर नाशिक महापलिकेने शहरात आता अंत्यसंस्कारासाठीही ऑनलाईन स्लॉट बुकिंग सुरू केलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मृतांची संख्या वाढली आहे. शहरातील अनेक स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियाना  तासंतास ताटकळत उभं रहावं लागतंय. एकाच वेळी 20  ते 25 मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असल्याने जमिनीवर जिथे जागा मिळेल तिथे विधी पार पाडले जात आहेत.  त्यामुळे मृत्यूनंतरची परवड थांबवण्यासाठी नाशिक मनपा प्रशासनाने ऑनलाईन बुकिंग सुरू केले आहे. यात शहरातील 6 विभागांमधील 17 स्मशानभूमीतील 80 बेडबाबतची माहिती उपलब्ध होते.


आता रुग्णालयात भरती करण्यासाठी कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्टची गरज नाही, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय


नाशिक शहरात केवळ नाशिक शहर, जिल्ह्यातीलच नाहीतर उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांवर देखील उपचार होत आहेत. दुर्दैवाने त्यापैकी कोणाचा मृत्यू झाला तर शहरातच अंत्यसंस्कार केले जात असल्याने मृतांचा आकडा वाढतोय. एखाद्या विभागातील स्मशानभूमीत स्लॉट उपलब्ध नसेल तर दुसऱ्या ठिकाणची माहिती तत्काळ उपलब्ध होत आहे. त्यामुळे पंचवटी, नाशिक पूर्व सारख्या स्मशानभूमीवरचा ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.


कोरोनाची दुसरी लाट थांबत नाही तोच तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाल्याने प्रशासनाने तयारी सुरू केलीय. त्याचाच  एक भाग म्हणून अंत्यसंस्कारासाठीही ऑनलाईन बुकिंग केली जात आहे. अर्थात नागरिकांनी स्वत: खबरदारी घेतली तर ही वेळच ओढवणार नाही. 


इतर बातम्या