मुंबई : नाशिकमध्ये डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. घडलेली दुर्घटना हा अपघात आहे, मात्र महापालिकेने ठेकेदार कंपनीसोबत केलेला करारनामा सदोष असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 


ऑक्सिजन प्लान्टसारख्या महत्त्वाच्या बाबींची देखभाल करताना कंपनीचे तंत्रज्ञ 24 तास हजर ठेवणे बंधनकारक असताना तिथे कुणीही हजर नव्हतं. महापालिकेने केलेल्या करारात ऑक्सिजन प्लान्टवर 24 तास तंत्रज्ञ हजर ठेवण्याची अट टाकली नव्हती. महापालिकेने ठेकेदारास करार करताना 17 रुपये लिटरप्रमाणे ऑक्सिजन खरेदी करण्‍यास मान्यता दिली होती, त्यामुळे सर्व जबाबदारी त्या कंपनीची असल्याचा करारात उल्लेख आहे. 21 एप्रिलला झालेल्या दुर्घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली होती. 


Nashik Oxygen Leakage : नाशिकमधील दुर्घटनेतील मृतांचा आकडा 24 वर, ही आहेत मृत रुग्णांची नावं


कशी घडली होती घटना? 


नाशिक महानगरपालिकेचे डॉ. झाकिर हुसेन हे 150 बेडचे कोविड रुग्णालय असून येथे 21 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता 157 रुग्ण दाखल होते.  त्यापैकी 131 रुग्ण ऑक्सिजनवर,  15 रुग्ण व्हेंटिलेटरवर व 61 रुग्ण क्रिटिकल होते. या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी 13 KL चा लिक्विड ऑक्सिजन टॅंक Taiyo Nippon या कंपनीकडून भाडेतत्वावर घेण्यात आलेला होता. उपरोक्त कंपनीकडून सदरचा टॅंक हा 10 वर्षाकरिता भाडेतत्वावर घेण्यात आलेला असून त्याची देखभाल दुरुस्ती व यामध्ये भरावयाचा लिक्विड ऑक्सिजन देण्याची जबाबदारीही कंपनीकडे आहे.  आज दुपारी सुमारे 12.30 वाजता डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे टॅंकची पाहणी केली असता, टॅंकच्या खालच्या बाजूला गळती आढळून आली. त्यामुळे टॅंकमधील ऑक्सिजन पातळी झपाट्याने कमी होत असल्याने रुग्णांस पुरेशा दबावाने ऑक्सिजन मिळत नसल्याचे दिसून आले. सदरची बाब रुग्णालयातील डॉक्टर यांनी तात्काळ निदर्शनास आणून दिली. सदरची बाब लक्षात येताच गळती दुरुस्तीसाठी शहरातील निखील गॅसचे मालक शेटे व पिनॅकल कंपनीचे इंजिनीयर यांना तातडीने घटनास्थळी बोलावण्यात आले. फायर टेंडरमधून पाणी फवारणी करून ऑक्सिजन  गळतीची जागा तज्ज्ञांनी शोधली. सदर गळतीची पाहणी करुन गळती होणारा पाईपचा भाग दुरुस्त करुन पुन्हा जोडणी करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयाचा ऑक्सिजनचा पुरवठा दुपारी सुमारे 1.45 ते 2 वाजता सुरळीत करण्यात आला. दरम्यानच्या काळात Taiyo Nippon या कंपनीचा लिक्वीड ऑक्सिजनचा टँकर दैनंदीन लिक्वीड ऑक्सिजन भरण्यासाठी स्थळावर आलेला होता व त्यामधून लिक्वीड ऑक्सिजन टँकमध्ये भरण्यात आले. या कालावधीमध्ये ऑक्सिजन पुरवठयाअभावी दुर्देवाने 24 रुग्णांचा मृत्यू झाला.


संबंधित बातम्या