नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरु असताना शनिवारी केंद्र सरकारकडून कोविड 19 उपचारासंदर्भात महत्वाचे बदल करण्यात आले आहे. यापुढे रुग्णालयात भरती करण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टची गरज लागणार नाही. पूर्वी रुग्णालयात भरती करण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट अथवा सीटी स्कॅनची गरज लागत होती. या निर्णयामुळे कोरोना संशयित रुग्णांवर वेळेतच उपचार सुरु होतील.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले, की कोरोना रुग्णांना कोविड सुविधांमध्ये दाखल करण्यासाठी राष्ट्रीय धोरणात बदल करण्यात आला आहे. मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, "कोरोनाचे संशयास्पद प्रकरण आढळल्यास त्याला सीसीसी, डीसीएचसी किंवा डीएचसी वॉर्डमध्ये दाखल केले जाईल. कोणत्याही रुग्णाला सेवेस नकार दिला जाऊ शकत नाही. यामध्ये ऑक्सिजन किंवा आवश्यक औषधे देखील समाविष्ट आहेत, जरी रुग्ण दुसर्‍या शहराचा असला तरी त्याला उपचार नाकारले जाणार नाहीत''


सध्या देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना संशयित रुग्णांची कोरोना चाचणी अहवाल येण्यासाठी दोन ते आठ दिवसांचा कालावधी लागत आहे. अशात रुग्णांकडे रिपोर्ट नसल्याने रुग्णालयात भरती करुन घेत नव्हते. त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचे जीव गेले आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे आता अनेकांना दिलासा मिळाला आहे.


शात कोरोनाचा कहर, 24 तासात 4 हजारांपेक्षा जास्त मृत्यू
देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांचीच संख्या केवळ वाढत नाही तर आता मृतांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. भारतात पहिल्यांदाच एका दिवशी चार हजारांपेक्षा जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे. तर सलग तिसऱ्या दिवशी चार लाखांपेक्षा जास्त नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.


आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासात  4 लाख 01 हजार 078 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 4 हजार 187 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 3 लाख 18 हजार 609 जण कोरोनामुक्त झाले आहेत.


7 मे पर्यंत देशभरात 16 कोटी 73 लाख 46 हजार 544 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर काल 22 लाख 97 हजार 257 जणांना लस दिली. आतापर्यंत एकूण 30 कोटी 4 लाखांपेक्षा जास्त जणांची कोरोना चाचणी केली असून काल 18 लाख नमुने घेण्यात आले, ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 22 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.