नाशिक : नाशिक महानगरपालिकेत भाजपचे 66 नगरसेवक आहेत, मात्र त्यांच्या पाठीला कणा नाही, सर्व लेचेपेचे आहेत, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला. नाशिक दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांवरही त्यांनी हल्लाबोल केला.
करवाढीसह विविध विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसने छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात नाशिक महापलिकेवर मोर्चा काढला. यावेळी भुजबळ यांनी तुकाराम मुंढे आणि सत्ताधारी भाजप भाजपच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर भुजबळ यांनी छोटेखानी सभा घेतली त्यावेळी बोलत होते.
नाशिक महापालिकेत खंडणीखोरासारख काम चालू असल्याचा गंभीर आरोप देखील छगन भुजबळ यांनी केला.
“तुकाराम मुंढे कायद्याने चालतात, असे भासवतात. मात्र नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. नागरिकांना कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका”, असा इशारा भुजबळ यांनी केला.
छगन भुजबळ यांनी नाशिक दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांवरही हल्लाबोल केला. फक्त नागपूरकडे लक्ष न देता नाशिककडेही लक्ष ठेवा, असा खोचक सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला.