नाशिक: सर्पमित्र विक्रमसिंग मलोतच्या सर्पदंशाने झालेल्या मृत्यूनंतर पोलिसांनी मोठी कारवाई सुरु केली आहे. विक्रमसिंगच्या भावासह 8 जणांवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वन्यजीव संरक्षण कायदा, तसेच घरात साप बाळगत विषारी सापांसोबत स्टंटबाजी करतांना विक्रमसिंगचा मृत्यू होऊ शकतो, हे माहित असूनही, त्याला उत्तेजन दिल्याप्रकरणी काल रात्री उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी भावासह 8 जणांना रात्रीतूनच अटक केली आहे. काही सर्पमित्रांचाही यात समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे या कायद्यामध्ये 7 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.

विक्रमचा मृत्यू डोंगराळ परिसरात सर्पदंशाने झाल्याचं सांगत आरोपींनी पोलिसांची सुरुवातीला दिशाभूल केली होती. मात्र आता सापांची तस्करीही केली जात होती का ? या अनुषंगाने पोलीस तपास सुरु आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

'हॅण्डलर' नावाने प्रसिद्ध असलेल्या पंजाबच्या विक्रम मलोतचा नाशिकच्या सामनगाव परिसरात 3 ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास सर्पदंशाने मृत्यू झाला होता. विक्रम त्याच्या धाकट्या भावासह मित्रांसोबत 3 ऑक्टोबरला दुपारी सामनगावच्या डोंगराळ परिसरात फिरायला गेला होता. तेव्हाच त्याच्या उजव्या हाताला सापाने दंश केला. यानंतर त्याला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितलं. जिल्हा रुग्णालयात दाखल होताच, रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मात्र काही तासांत विक्रमसिंह मलोतच्या मृत्यूला वेगळं वळण मिळालं. सापासोबत स्टंटबाजी करताना, दंश झाल्याने विक्रम मलोतचा मृत्यू झाल्याचा संशय नाशिक पोलिसांना आहे. एक नाग विक्रम मलोतला चावत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावरुनच स्टंटबाजी करताना त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांना आहे. परंतु हा व्हिडीओ कधीचा आहे, याचा तपास सुरु आहे.

नागासोबत स्टंटबाजी करताना सर्पमित्र विक्रम मलोतचा मृत्यू?

VIDEO: