नाशिक : पंजाबमधील सर्पमित्र विक्रमसिंह मलोत याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. सापासोबत स्टंटबाजी करताना, दंश झाल्याने विक्रम मलोतचा मृत्यू झाल्याचा संशय नाशिक पोलिसांना आहे.

एक नाग विक्रम मलोतला चावत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरुनच स्टंटबाजी करताना त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांना आहे. परंतु हा व्हिडीओ कधीचा आहे, याचा तपास सुरु आहे. शिवाय हे प्रकरण नाशिकरोड पोलीस स्टेशनहून उपनगर पोलिसात वर्ग होण्याची शक्यता आहे.

'हॅण्डलर' नावाने प्रसिद्ध असलेल्या पंजाबच्या विक्रम मलोतचा नाशिकच्या सामनगाव परिसरात 3 ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास सर्पदंशाने मृत्यू झाला होता. विक्रम त्याच्या धाकट्या भावासह मित्रांसोबत 3 ऑक्टोबरला दुपारी सामनगावच्या डोंगराळ परिसरात फिरायला गेला होता. तेव्हाच त्याच्या उजव्या हाताला सापाने दंश केला. यानंतर त्याला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितलं. जिल्हा रुग्णालयात दाखल होताच, रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.