नाशिक : नाशिकला 'वाईन कॅपिटल ऑफ इंडिया'ची ओळख देणारं 'सुला वाईन्स'. वाईन प्रेमींचं हॉट फेव्हरेट डेस्टिनेशन. पण हेच सुला आता ऊर्जेच्या बाबतीतही स्वयंपूर्ण झालं आहे. पैशाची बचत, पर्यावरण संवर्धन करत दोनशे पेक्षाही अधिक गावांना पुरेल इतकी ही वीज निर्मिती सौरउर्जेच्या माध्यमातून निर्माण झाली आहे.
सुला वाईन्सच्या बाटल्यांवर असणाऱ्या या सूर्यदेवतेच्या प्रतिमेची आराधना करताना याच सूर्याची ऊर्जा संकलित केली आहे. आपल्या इमारतींवर 1.27 मेगावॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवून तब्बल 17 लाख 50 हजार युनिट्सची ऊर्जा एकट्या सुला वाईन्सनं तयार केली आहे.
वीजेची वाढती गरज, महागडे दर, तुटवडा, लोडशेडींग या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी अनेक उद्योगांनी आता सौरउर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याकडे वाटचाल सुरु केली आहे.
या सोलर पॅनल्समुळे महावितरणकडून घेतल्या जाणाऱ्या विजेची बचत झाली. वीज निर्मितीमुळे होणारं वातावरणातलं प्रदूषण कमी झालं. इमारती थंड झाल्यामुळे एसी, फॅनचा वापर कमी झाला. गरम पाण्यासाठी लागणारं 23 हजार लिटर डिझेल वाचलं. 151 स्कायलाईटच्या उजेडात सुला वाईन्स उजळून निघालं.
सोलर पॅनलच्या या प्रकल्पाचे काय फायदे?
• एका घराचा दर महिन्याला वीज वापर साधारण 60 युनिट
• वर्षाला 720 युनिट एका घराची वीजेची गरज
• सुमारे अडीच हजारापेक्षा अधिक घरांना आणि 200 पेक्षाही अधिक लहान गावांना पुरेल इतकी वीज एकट्या सुला विनियार्डने या प्रकल्पातून निर्माण केली
• ही वीज महावितरण कडून न घेतल्यामुळं 1 हजार 178 मेट्रीक टन कार्बनडाय आॅक्साईड वातावरणात जाऊन होणारं प्रदुषणही टळलं
• ही पॅनल्स छपरावर बसवल्यामुळे कंपनीतला एसी आणि पंख्यांचा वापर कमी झाल्यानं वीज बचत
• गरम पाणी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 23 हजार लीटर डिझेलची बचत. शिवाय 33 हजार मेट्रीक टन कार्बनडाय आॅक्साईडचं उत्सर्जन थांबलं
• 151 स्काय लाईटच्या उजेडात कंपनी उजळून निघाली आणि वर्षाला 38 हजार युनिट वीजेची बचत
• सुला प्रमाणंच इतरही 20 लहानमोठ्या कंपन्यांकडून अशाप्रकारे वीज निर्मिती
सुलाच्या प्रेरणेनं इतर कंपन्यांनीही वीजनिर्मिती सुरु केली. सुलाच्या उपक्रमाची प्रेरणा घेतली, तर अवघा महाराष्ट्र सौरऊर्जेने प्रकाशमान होण्यास वेळ लागणार नाही.