नाशिक : महाराष्ट्रातील नाशिकमध्ये असलेल्या करन्सी नोट प्रेसने मागील 15 दिवसात नोटांची छपाई 40 टक्क्यांनी वाढवून 500 रुपयांच्या सुमारे 8 कोटी नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सोपवल्या आहेत.
करन्सी नोट प्रेस दरदिवशी एक कोटी नोटांच्या जागी 1.4 कोटी नोटा छापत आहे. काही काळापूर्वी देशाच्या अनेक भागात उद्भवलेल्या क्रॅश-क्रंचची परिस्थिती पाहून हा बदल करण्यात आला आहे.
सीएनपी सूत्रांच्या माहितीनुसार, "प्रेस सध्या दरदिवशी 500 च्या 80 लाख आणि 50 रुपयांच्या 60 लाख नोटा छापत आहे. इतकंच नाही तर सरकारी सुट्टी आणि रविवारीही काम सुरु आहे. 1 मे (महाराष्ट्र दिन) रोजीही इथे छपाईचं काम सुरु होतं.
1 एप्रिलपासून छपाई प्रतिदिन 1.8 कोटी नोटांवरुन घसरुन प्रतिदिन 1 कोटी नोटांवर पोहोचली होती. पण प्रशासनाच्या निर्देशानंतर छपाई वाढवून 1.4 कोटी नोटा प्रतिदिनपर्यंत पोहोचल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, काही आठवड्यातच 1.8 कोटींपासून 2 कोटी नोटा दररोज छापण्याची योजना आहे."
आरबीआयाच्या निर्देशाची प्रतीक्षा
आरबीआयने नोव्हेंबर 2017 पासून एप्रिल 2018 पर्यंत प्रेसला नवा कोणताही आदेश दिलेला नाही. त्यामुळे इथे 500 रुपयांच्या नोटांची छपाई केली जात नव्हती. आरबीआयकडून नव्या डिझाईनच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रेसने एप्रिलपासून 100 आणि 20 रुपयांच्या नोटाही छापलेल्या नाहीत. 200 रुपयांच्या नोटांच्या छपाईचा आदेश मध्य प्रदेशच्या प्रेसला दिल्याने नाशिकमध्ये ह्या नोटांचीही छपाई बंद होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, एप्रिलच्या मध्यापर्यंत 500 च्या नव्या नोटांची छपाई सुरु करण्यात आली. या नोटा बाजारात येण्यासाठी एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागला. आता दरदिवशी 500 रुपयांच्या 80 लाख नोटां छापल्या जात आहेत. काही दिवसांतच दरदिवशी 1.2 कोटी नोटा छापण्याचा प्रयत्न सुरु आहे.
सध्या नाशिकमधील प्रेसमध्ये 50 आणि 500 रुपयांच्या नोटांचीच छपाई सुरु आहे.
कॅश-क्रंचमुळे नागरिक अडचणीत
काही दिवसांपूर्वी देशाच्या विविध राज्यांमध्ये एटीएममधून पैसे येत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि गुजरातच्या अनेक शहरांमधल्या एटीएममधून रोकड संपली होती.
लोग फायनान्शिअल रिझॉल्यूशन अँड डिपॉझिट इन्शुरन्स बिलच्या बेल-इन क्लॉजअंतर्गत पैसे बुडण्याच्या भीतीने अनेकांनी आपल्या अकाऊंटमधून रोकड काढली. हे कॅश-क्रंचचं मोठं कारण असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
काही जाणकारांनी श्रीमंतांवर कॅश होर्डिंगाचाही संशय व्यक्त केला. तर काही भागात नोटांच्या मागणीत फारच वाढ झाली, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं होतं. देशात गरजेपेक्षा जास्त नोटा चलनात असून बँकांमध्येही आवश्यक नोटा उपलब्ध आहेत, असंही त्यांनी सांगितलं होतं.