नाशिक: मनमाड - मुंबई पंचवटी एक्स्प्रेस आजपासून नव्या रंगात, नव्या सुविधांसह प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे.


आरामदायी बैठक व्यवस्था, आसनालगत मोबाईल चार्जिंगची सुविधा, बोग्यांना नवा रंग, बोगीच्या दोन्ही बाजूला कचरा पेटीची व्यवस्था, अशा एक ना अनेक सोयी-सुविधा पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आहेत.

ही पंचवटी एक्स्प्रेस आजपासून प्रवाशांच्या सेवेत  दाखल झाली आहे.

रेल परिषदेने केलेल्या सूचना स्वीकारत, रेल्वेने नव्या रंगात ही रेल्वे नाशिककरांच्या सेवेत रुजू केली आहे.

रेल्वेने पंचवटी एक्स्प्रेसचा चेहरामोहरा  बदलला आहे. त्यामुळे नाशिककरांचा मुंबईपर्यंतचा प्रवास सुखकर होणार आहे.

जिल्ह्यातील चाकरमान्यांची प्रमुख भिस्त असणारी रेल्वेगाडी म्हणून मनमाड-नाशिक-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसची ओळख आहे. नोकरी, व्यापार, तत्सम कारणांस्तव हजारो नागरिक या गाडीने प्रवास करतात.

नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक आदींसाठी ही सोयीची गाडी आहे.



ज्यांच्यामुळे गाडी सुरु झाली, त्यांनाच गाडी पाहता आली नाही

दरम्यान, या गाडीतील सोईसुविधांसाठी रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या गाडीच्या स्वागतासाठी ते नाशिक रेल्वे स्टेशनवर होते. आज सकाळी त्यांनी एबीपी माझाला प्रतिक्रियाही दिली. मात्र ही रेल्वे स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच बिपीन गांधी यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यातच त्यांचं निधन झालं.

ज्यांच्यामुळे ही गाडी नव्या रंगात, नव्या ढंगात सुरु झाली, तेच पाहायला बिपीन गांधी हयात नव्हते. त्यामुळे रेल परिषदेच्या सदस्यांवर दु:खाचं सावट आहे.

संबंधित बातम्या 

रेल्वे प्रवाशांसाठी लढणाऱ्या बिपीन गांधींना प्लॅटफॉर्मवरच मृत्यूनं गाठलं!