नाशिक : टोळीने फिरणारे गुंड तुम्ही आजपर्यंत बघितले असतील मात्र टोळीने फिरणारे पोलिस तुम्ही कधी बघितले आहेत? नाशिक शहरातील रस्त्यांवर सध्या असंच चित्र बघायला मिळत आहे. पोलिस आयुक्तपदाचा कारभार स्वीकारताच विश्वास नांगरे पाटलांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गुंडाच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. त्यासाठी नवनवीन उपक्रम त्यांच्याकडून राबवले जात आहेत. आठवडाभरापासून 'आय अँड इयर' हा नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.

तुमच्या परिसरातील नागरिकांना आपला पोलिस निरीक्षक कोण ते कळावा, यासोबतच परिसरातील टवाळखोरांवर वचक बसावा, म्हणून शहरातील सर्वच 13 पोलिस ठाण्याच्या पोलिसांना सकाळी 10 ते 12 तसेच संध्याकाळी 5 ते 7 या काळात त्यांच्या हद्दीत पायी पेट्रोलिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रत्येक नागरिक पोलिसांचे कान आणि डोळे बनावे, असा 'आय अँड इयर' या उपक्रमामागील उद्देश असल्याचं विश्वास नांगरे पाटलांनी सांगितलं.

पायी पेट्रोलिंग करत पोलिसांकडून टवाळखोरांवर तर कारवाई केलीच जात आहे. सोबतच महिला आणि व्यापारीवर्गाला सतर्कतेचे आवाहनही केलं जातं. पोलिसांच्या या उपक्रमाचं नागरिकांकडूनही स्वागत केलं जात असून ही कारवाई तात्पुरती न ठेवता कायमस्वरुपी चालू ठेवावी, अशी मागणीही ते करत आहेत.

महिलांची छेडछाड, चोऱ्या, घरफोड्या या नाशिकमध्ये जणू रोजच्याच झाल्या आहेत. विश्वास नांगरे पाटील यांनी चार्ज घेताच 18 दिवसात जवळपास 500 हून अधिक टवाळखोरांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. 112 गुंडांची तडीपारीची यादी त्यांनी तयार केली आहे. यासोबतच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. एकंदरीतच काय तर निवडणुकीसाठी आता नाशिक पोलिस सज्ज झाले असून ते चांगलेच अॅक्शनमध्ये आले आहेत. फक्त 'नव्याचे नऊ दिवस' ही म्हण खरी ठरु नये हीच नाशिककरांची अपेक्षा..