नाशिक : नाशिकच्या येवला येथे आचारसंहिता भंग केल्याचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता लागू झालेली असताना कोणतीही परवानगी न घेता येवला तहसील कार्यालयात उपोषण केल्याप्रकरणी पोलिसांकडून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येवला तालुक्यातील मुरमी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी नऊ जणांनी येवला तहसील कार्यलयाच्या आवारात उपोषण सुरु केलं होतं. मात्र उपोषणाला बसण्यापूर्वी उपोषणकर्त्यांनी संबधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही पूर्व परवानगी घेतली नव्हती. याबाबत विजय रोढे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
विजय रोढे यांच्या तक्रारीनंतर येवला शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी उपोषणाला बसलेल्या आनंदा पानसरे, गणेश बगाटे, रावसाहेब शिंदे, बाळू जोंधळे, आनंदा सोनावणे, सुनिता जोंधळे, बाबासाहेब शिंदे, राजाराम पानसरे, बबन शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे सर्वजण येवला तालुक्यातील मुरमी या गावाचे रहिवाशी आहेत.
देशात सतराव्या लोकसभा निवडणुकीची 10 मार्चला घोषणा झाली आणि तेव्हापासून आचारसंहिता लागू झाली आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे.
VIDEO | राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट | एबीपी माझा