नाशिक : नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या हेल्मेट सक्ती मोहिमेला चक्क पोलिसांकडूनच हरताळ फासला जात आहे. पोलीस कर्मचारी विनाहेल्मेट शहरात मोकाट फिरत असल्याचे दृश्य एबीपी माझाच्या कॅमेरात कैद झाले आहेत. त्यामुळे नियम हे फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहेत का? कारवाईचा बडगा फक्त आमच्यावरच का? असा प्रश्न नाशिककर उपस्थित करत आहेत. 


शिस्तप्रिय आणि नियमांना धरुन चालणारे अधिकारी म्हणून नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची ओळख आहे. नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाचा कारभार हाती घेतल्यापासून त्यांनी हेल्मेट सक्ती मोहीम राबवण्यास सुरुवात केली. शंभर टक्के नाशिककरांनी हेल्मेट परिधान केलेलं त्यांना बघायचं आहे. मात्र सध्यातरी त्यांचं हे स्वप्न पूर्ण होत नसल्याचंच दिसून येत आहे. विशेष म्हणजे याला कारण ठरत आहेत ते म्हणजे त्यांच्याच पोलीस प्रशासनातील कर्मचारी. 


एकीकडे हेल्मेट सक्तीच्या कारवाईच्या नावाखाली नागरिकांकडून पोलीस पावत्या फाडत आहेत तर दुसरीकडे मात्र अनेक पोलीस कर्मचारीच बिनधास्तपणे विनाहेल्मेट शहरातून प्रवास करत असल्याची दृश्य एबीपी माझाच्या कॅमेरात कैद झाली आहेत. मुंबई नाका, पंचवटी, नाशिकरोडच नाही तर चक्क पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर देखील हे कर्मचारी हेल्मेट न घालताच दुचाकीवरुन प्रवास करत असल्याचं बघायला मिळतं. त्यांच्यावर मात्र कुठलीच कारवाई होत नसल्याने नाशिककर नाराजी व्यक्त करत आहेत. कारवाईचा बडगा फक्त आमच्यावरच का? असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत.  


पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात 15 ऑगस्ट 2021 पासून चार टप्प्यात हेल्मेटसक्ती मोहीम राबवण्यात येत आहे. सुरुवातीला नो हेल्मेट नो पेट्रोल, त्यानंतर हेल्मेट नसेल तर समुपदेशन, तिसऱ्या टप्प्यात नो हेल्मेट नो को ऑपरेशन आणि त्यानंतर थेट दंडात्मक कारवाईला जानेवारी महिन्यापासून सुरुवात करण्यात आली आहे. 20 जानेवारी ते 29 मार्चपर्यंत 14 हजार 134 नागरिकांकडून जवळपास 70 लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. तसं बघितलं तर एकीकडे शहरात गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलं आहे, गंभीर गुन्ह्यांचीही उकल करण्यात पोलिसांना अपयश येतय तर दुसरीकडे पोलीस मात्र हेल्मेटसक्ती मोहीम राबवण्यातच व्यस्त असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.      


नाशिकमध्ये अनेक पोलीसच हेल्मेटचा वापर करत नसल्याने नियम, हेल्मेटसक्ती ही फक्त आमच्यासाठीच लागू आहे का? असा सवाल नाशिककर उपस्थित करत आहेत. आता नियम मोडणाऱ्या या पोलिसांवर पोलीस आयुक्त कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.