Nashik Crime News : तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न (Wedding) ठरत नाही, आणि तुम्ही जर एखाद्या एजंटच्या माध्यमातून स्थळ शोधत असाल तर सावधान, कारण नाशिकमध्ये (Nashik) कोरोना काळात (Coronavirus) बोगस लग्न (Fake Wedding) लावून देत पैसे उकळणाऱ्या दोन एजंटच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या सर्व प्रकाराने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अशाप्रकारे काम करणारे रॅकेटच (Racket) महाराष्ट्रात सक्रिय असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. नेमका प्रकार काय? 


कोरोना काळात बोगस लग्न लावणारे रॅकेट सक्रिय
नाशिकच्या सिन्नरमध्ये राहणारे साहेबराव गीते तर दुसरे आहेत निफाडचे संतोष फड या दोघांनी कोरोना काळात यांनी एक नवीन धंदा सुरु केला होता, त्या दोघांनी केवळ पैशासाठी अनेक बोगस लग्न लावून देत मुलगा किंवा मुलीच्या कुटुंबाकडून पैसे उकळल्याचे समजते. येवला तालुक्यातील एका 23 वर्षीय तरुणाचे लग्न जमत नसल्याने त्याचे आई वडील चिंतेत होते, स्थळाच्या शोधात असतांनाच त्यांना या दोघांचा मोबाईल नंबर मिळाला, त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधताच बीड मधील आंबेजोगाई गावात एका मुलीसोबत आम्ही तुमच्या मुलाचे लग्न लावून देतो, मात्र त्यासाठी 3 लाख रुपये कमिशन लागेल अशी त्यांनी अट घातली. ही अट मान्य करताच 14 मे 2021 रोजी साहेबराव आणि संतोष हे येवल्यातील मुलाच्या घरी गेले, तिथे कुटुंबाची मोबाईल मध्ये शूटिंग घेत मुलीच्या आईला पाठवली. त्यानंतर मुलीचे घर आपण बघून येऊ अशी ईच्छा मुलाच्या आईने व्यक्त करताच कोरोनामुळे जिल्हाबंदी असल्याने आपल्याला तिकडे जाता येणार नाही असे त्यांना कारण देण्यात येऊन दुसऱ्या दिवशी 2 लाख रुपये त्यांनी मुलाच्या घरच्यांकडून उकळत 16 मे रोजी रात्री आपल्याला अंबेजोगाईला लग्नासाठी निघायचे आहे असे सांगितले.. 


एक महिन्यासाठीच मुलगी देण्याचे ठरले होते?


मुलाचे लग्न होणार या आनंदात 16 मे 2021 ला दुपारी आई वडिलांनी मुलासाठी कपडे तर होणाऱ्या सुनबाईसाठी मनी मंगळसूत्र, कानातले आणि इतर सामान खरेदी केले आणि त्याच रात्री मुलाचे आई वडील, साहेबराव आणि संतोष हे अंबेजोगाईला निघाले. एक दिवस त्यांनी गाडीतच मुक्काम केला आणि 17 तारखेला सकाळी त्यांनी अंबेजोगाई गाठले. अंबेजोगाई गावाजवळील एका मंदिरात त्यांना नेण्यात आले, काही वेळाने मुलीसह मुलीची आई आणि चार महिलाही तिथे पोहोचल्या. मुलीकडची मंडळी येताच ठरल्याप्रमाणे ३ लाखांमधील उरलेले एक लाख रुपये साहेबराव आणि संतोष यांना देण्यात आले. मंदीर बंद असल्याने मंदिराबाहेरच ओट्यावर फक्त गळ्यात माळा घालून देत अगदी साध्या पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला आणि त्यानंतर नवऱ्या मुलीला घेऊन मुलाकडचे मंडळी येवल्याला आपल्या गावी परतले. लग्न होऊन काही दिवस उलटत नाही, तोच सुनबाईची आई मुलाच्या घरी आली आणि मुलीला ती आपल्यासोबत घेऊन गेली. मात्र जाता जाता तिने जे काही सांगितले, त्याने या कुटुंबाला धक्काच बसला.. एक महिन्यासाठीच मुलगी देण्याचे ठरले होते आणि त्यासाठी मला 35 हजार रुपये देण्यात आले होते असं मुलीच्या आईने म्हणताच मुलाच्या आईने थेट येवला पोलिस ठाणे गाठले.


3 लाख रुपये कमिशन


नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले,  प्रवासामध्ये दोन एजंट सोबत मुलाच्या कुटुंबाची भेट झाली होती. कमिशन लागेल सांगितले होते, 3 लाख रुपये घेतले. लग्नानंतर भांडण करून दागिने आणि पैसे घेऊन पळून गेली होती. दोन एजंटला अटक करण्यात आलीय. त्यांनी पूर्वी देखील असे गुन्हे केल्याचं निष्पन्न झाले आहे. मुलीच्या आईलाही पैसे दिले होते, काही दिवसात मुलगी परत येईल असे सांगितले होते. असे अनेक प्रकार घडले असावे, त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे. सध्या आरोपी पोलिस कोठडीत आहेत, इतर कोणी आरोपी यामध्ये सहभागी आहे का ? याचा तपास सध्या सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाह पोलिसांनी केले आहे.    


पोलीसांकडून आवाहन


घडलेल्या या सर्व प्रकारानंतर संबंधित कुटुंबावर काय वेळ आली असेल हे शब्दात सांगणं अवघड आहे. आता किमान लग्नात झालेला खर्च तसेच या दोन एजंटने लुटलेले 3 लाख रुपये तरी आम्हाला मिळावे अशी मागणी या मुलाची आई करतेय.  विशेष म्हणजे संबंधित मुलीचे नाव तसेच जातही खोटी सांगण्यात आल्याचं पोलिस तपासात समोर आलय. आरोपींनी या पूर्वी देखील असे गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं असून अशाप्रकारे काम करणारे रॅकेटच सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे, त्यांच्या साथीदारांचा सध्या ते शोध घेतायत. कोणाची अशाप्रकारे फसवणूक झाली असल्यास तक्रार देण्यास त्यांनी पुढे यावं असं आवाहनही नाशिक ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आहे.


महत्वाच्या बातम्या


राज्यभरातील दारू विक्रेत्यांना सरकारचा मोठा दिलासा, वाढीव परवाना शुल्क दर शासनाने केले कमी


Maharashtra School : राज्यातील शाळा एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ सुरु राहणार, उन्हाळी सुट्टी रद्द


Aaditya Thackeray : नाणार रिफायनरीचं काय होणार? पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले...