नाशिक : एका घटनेमुळे नाशिकचा बागलाण तालुका सध्या हादरुन गेला आहे. काही दिवसांच्या अंतराने महड गावातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या घटनेला 20 दिवस उलटून देखील मृत्यूमागील कारण हे अस्पष्ट असल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.    


तारीख 25 एप्रिल, दुपारी बाळू सोनवणे कुटुंबातील या आजोबांचा मृत्यू तर याच दिवशी रात्री आजोबांचा नातू हरीश सोनवणेनेही प्राण सोडले. तारीख 29 एप्रिल नात नेहा सोनवणे हिने देखील जगाचा निरोप घेतला. बागलाण तालुक्याच्या महड गावातील सोनवणे कुटुंबातील तिघांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे. 14 एप्रिलला रात्री जेवण करुन हे कुटुंबीय झोपी गेलं होतं. मात्र दुसरा दिवस उजाडताच सकाळी हरीशला अस्वस्थ वाटू लागले, दुपारी हरिशचे आजोबा बाळू सोनवणे, हरीशची बहीण नेहा आणि हरीशची आई सरिता सोनवणे हिला देखील त्रास जाणवू लागला. आजोबांना पुण्यातील मिलिटरी रुग्णालयात तर इतर तिघांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरु असतानाच 25 एप्रिलला आजोबांचा तर त्याच रात्री हरीशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर चार दिवसांनी नेहानेही जगाला निरोप दिला असून तिची आई सरिता सोनवणे या सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. याबाबत जायखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.  






"जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 15 एप्रिलची घटना आहे. एका कुटुंबातील चौघांना अस्वस्थ वाटलं होतं. काहीतरी चावलं असावं किंवा विषबाधा झाल्याची शक्यता डॉक्टर वर्तवत आहे. आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घरात हे चौघेच झोपले होते. कुलरजवळ कीटकनाशके होते त्याबाबतही तपास सुरु आहे. इतर काही चावलं का? काही संशयास्पद आहे यासाठी सर्व पर्याय तपासात आहोत," अशी माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.


विशेष म्हणजे या घटनेला आता जवळपास 20 दिवस उलटून गेले आहेत, मात्र त्यांच्या मृत्युमागील नक्की कारण ना पोलीस सांगू शकत आहेत ना डॉक्टर.


बीडच्या अंबाजोगाईतील दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू


"फूड पॉयझनिंग, इन्सेक्टिसाईड असण्याची शंका आहे. तपासणीसाठी नुमने पाठवले असून तपास सुरु आहे. साप चावल्यासारखे देखील लक्षणं होते. रक्तात मॅगनीझ आणि टिन याचे प्रमाण वाढलेले दिसले. 10 ते 15 दिवसात रिपोर्ट्स येतील," असं अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन श्रीनिवास यांनी सांगितलं.      


हे कुटुंबीय घरात झोपलेले असताना कुलरजवळ काही कीटकनाशके ठेवली होती आणि ते हवेत पसरल्यामुळे यांचा मृत्यू झाल्याची देखील चर्चा आहे. मात्र सोनवणे यांच्या नातेवाईकांनी ही निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. एवढे दिवस उलटूनही डॉक्टर कारण सांगू शकत नसल्याने नातेवाईक संतप्त असून हा कुठला एखादा वेगळा आजार तर नाही ना? असाही प्रश्न ते उपस्थित करत आहेत. आता किमान या लहान मुलांच्या आईला तरी वाचवा अशीच मागणी ते करत आहेत.




याविषीयी मुलांचे काका गोविंद निकम म्हणाले की, "तिघे जण गंभीर होते. त्यांना काय झालं हे तिन्ही हॉस्पिटलला कळलं नाही. तिघे जण गेले पण इतरांना कोणाला त्रास व्हायला नको. कुलरजवळील किटकनाशकांमुळे मृत्यू ही अफवा आहे. घरात हवेशीर वातावरण आहे. कशाने मृत्यू झाला याचा शोध घ्यावा. मुलाला आदल्या दिवशी चक्कर आली. डॉक्टरकडून आल्यानंतर तो खेळायला लागला. दुसऱ्या दिवशी त्याला मालेगावला व्हॅनिटीवर नेले. मुलीला आणि आजोबाला दुसऱ्या दिवशी त्रास झाला. आजोबांना पुण्याला अॅडमिट केलं. आधी आम्हाला सर्पदंश झाल्याचं वाटत होतं. उपचार सुरु असताना हा प्रकार नसल्याचं कळलं. नेमका मृत्यू कशाने झाला याचं निदान अजून झालेलं नाही."


एकंदरीतच काय तर एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूमागील गूढ काय? हा काही घातपाताचा तर प्रकार नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांच्या तपासाकडे आता सगळ्यांचं आता लक्ष लागलं आहे.