CBI raids at Avinash Bhosale residence and home : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयनं छापेमारी केली आहे. यस बँक आणि डीएचएफएल घोटाळा प्रकरणी सीबीआयची पुणे - मुंबई परिसरात छापेमारी सुरु असल्याची माहिती आहे.

  सीबीआय मुख्यालयातील टीम मुंबई युनिटसोबत बँक फसवणूक प्रकरणाशी संबंधित ही छापेमारी असल्याची माहिती आहे. अविनाश भोसले यांच्या घरी आणि अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे.  सोबतच शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्यावर देखील छापे पडले असल्याची माहिती आहे. 


मुंबई आणि पुण्यातील 8 ठिकाणी ही छापेमारी झाली असल्याची माहिती आहे. व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. या अटकेशी संबंधित ही छापेमारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


दरम्यान या छापेमारीसंदर्भात बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की,वाधवान ब्रदर्स यांनी जबरदस्त लुटलं आहे. बीकेसीत छाब्रिया यांचं आॅफिस आहे आणि बीकेसीतून जवळच बांद्रा इथे कुणाच्या खात्यात पैसे गेले याचीही चौकशी होणार आहे. हे मी जबाबदारीने बोलतोय, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. 


अविनाश भोसले हे एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रवर्तक आहेत. अविनाश भोसले हे प्रसिद्ध उद्योगपती आणि महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असलेले एक व्यक्ती आहेत. ते महाराष्ट्रातील मंत्री आणि कॉंग्रेस नेते विश्वजित कदम यांचे सासरे आहेत.


ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील भोसले यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी आणि मुंबईतील काही ठिकाणी छापा टाकला होता.  अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित या दोघांचीही चौकशी करण्यात आली होती. भोसले यांनी ईडीच्या कारवाईविरोधात कोर्टातधाव घेतली होती. 


ईडीने भोसले आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची परदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा 1999. (FEMA) अंतर्गत स्वतंत्र चौकशीत सुमारे 40 कोटींची संपत्ती जप्त केली होती.