नाशिक : नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज यंदाच्या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी 1 हजार 785 कोटींचा अर्थसंकल्प असून, यामध्ये मालमत्ता कर आणि पाणीपुरवठा करात वाढ करण्याची सूचना करण्यात आली आहे.


याशिवाय नाशिकमध्ये पार्किंगची समस्या पाहता शहरातल्या 33 ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. यापैकी पाच ठिकाणी रस्त्याच्या कडेला तर उर्वरित ठिकाणी मोकळ्या जागेत पार्किंग असणार आहे.

महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी या योजना राबवत असल्याचं तुकाराम मुंढेंनी यावेळी सांगितलं.

याआधीही तुकाराम मुंढेंनी घरपट्टीत घसघशीत 50 टक्के वाढ केली होती. मात्र महापौरांनी आयुक्तांना झटका देत ही वाढ 18 टक्क्यांपर्यंत कमी केली. त्याचवेळी आयुक्तांना ब्र काढण्याची संधीही महापौरांनी दिली नाही.

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

- सायकल शेअरिंग प्रकल्प राबवणार

- रस्ते विकासासाठी 70 कोटींची तरतूद

- पार्किंग सुविधेसाठी 2.19 कोटींची तरतूद

- नागरिकांनी कचरा विलगीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई

- प्लास्टिक मुक्त शहरात बनविणार

- पाणीपुरवठा योजना तोट्यात

- पाणी गळती थांबवण्यासाठी अत्याधुनिक प्रणालीचा वापर होणार

- स्मार्ट सिटीअंतर्गत जलमापक बसवण्यासाठी 249 कोटी

- जुन्या जलवाहिनी काढून त्या जागी 101 किलोमीटर लांबीच्या नवीन जलवाहिनी बसविणार

- नवीन वसाहतीत 102 किलोमीटर लांबीच्या जलवाहिनी बसवणार, यासाठी 176.93 कोटींची तरतूद

- गोदावरी आणि उपनद्यांचे प्रदूषण दूर करणार

- मलनिस्सारण केंद्राची बांधणी करणार, त्यासाठी 261.91 कोटींची तरतूद

- मनपा शाळा डिजिटल होणार, 11 कोटींची तरतूद

- व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून सर्व शाळा एकमेकांना जोडणार

- शिक्षण विभागासाठी एकूण 64.44 कोटींची तरतूद

- दिव्यांगासाठी विशेष शाळा स्थपना करणार

- अग्निशमन दलासाठी 14.22 कोटींची तरतूद