मुंबई : राज्यातील प्रवाशांना दिलासा देत मोठ्या काही दिवसांपूर्वी थाटात सुरु झालेली नाशिक-मुंबई विमानसेवा ठप्प झाली आहे. तांत्रिक कारणांमुळे 15 मार्चपासून नाशिक-मुंबई विमानाचं उड्डाण झालेलं नाही.


इतकंच नाही तर नाशिक-पुणे, जळगाव-मुंबई या विमानसेवाही बंद झाल्या आहेत. 'एअर डेक्कन' ही विमान कंपनी या सेवा पुरवते. मात्र तांत्रिक कारणांमुळे या मुंबई-नाशिक, नाशिक-पुणे आणि मुंबई-जळगाव ही विमान सेवा थांबवण्यात आली आहे.

दरम्यान, 28 मार्चपासून या सेवा पुन्हा सुरु करण्यात येतील, अशी माहिती एअर डेक्कन कंपनीकडून देण्यात आली आहे.

उडाण योजनेअंतर्गंत 24 डिसेंबरपासून नाशिक-मुंबई विमानसेवा सुरु झाली होती. अनेक दिवस शुभारंभ लांबल्यानंतर अखेर या विमानसेवेच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला होता. मात्र अवघ्या तीन महिन्यांतच तांत्रिक कारणांमुळे ही सेवा स्थगित झाली.