नाशिक : नाशिक (Nashik) शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये मोठा ड्रग्ज (Drugs) साठा सापडला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान  300 कोटीहून अधिक रकमेचा हा साठा असल्याची माहिती देण्यात येत आहे. दरम्यान ड्रग्ज प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान एमडी ड्रग्स आणि ड्रग्स बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल पोलिसांनी जप्त केला. नाशिकमधील शिंदे एमआयडीसीमध्ये परिसरात हा साठा मोठा सापडला असल्याची माहिती देण्यात आली आहे. 


दोनच दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी शिंदे एमआयडीसी परिसरामध्ये मोठी कारवाई केली होती. त्यानंतर नाशिक पोलिसांकडून पुन्हा एकदा त्याच भागामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक शहर ड्रग्जच्या विळख्यात तर सापडलं नाही असा सवाल आता उपस्थित केला जातोय. त्यामुळे नाशिकमध्ये सुरु असलेल्या या ड्रग्ज प्रकरणाचा पोलिसांकडून देखील तपास सुरु आहे. या तपासात आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


मुंबई पोलिसांची कारवाई


मुंबई पोलिसांकडून नाशिकमधल्या अंमली पदार्थाच्या कारखान्यात धाड मारत करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण 12 जणांना अटक करण्यात आली. नाशिक रोडवरील शिंदे गाव एमआयडीसीमध्ये एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीवर मुंबई पोलिसांनी छापा टाकला. सुमारे 300 कोटींचे दीडशे किलोपेक्षा अधिक ड्रग्ज पोलिसांनी हस्तगत केले असून मुंबईसह देशाच्या वेगवेगळ्या भागातून बारा जणांची धरपकड केली. या कारवाईमध्ये पकडण्यात आलेल्या झिशान इक्बाल शेख असे आरोपीचे नाव आहे.


पुण्यातील ससून रुग्णालयात ड्रग्ज रॅकेट


पुण्यातील ससून रुग्णालय हे पैसेवाल्या आरोपींचे दुसरे घर बनल्याचं दिसत आहे. येरवडा कारागृहात कैदेत राहण्याचं टाळण्यासाठी हे आरोपी उपचारांचं कारण देऊन ससून रुग्णालयात भरती होतात आणि पुढे महिनोनमहिने ससूनमधेच तळ ठोकतात. त्यासाठी येरवडा कारागृहातील अधिकारी आणि ससूनमधील अधिकारी यांना लक्ष्मी दर्शन घडवलं जातं. ड्रग माफिया ललित पाटील हा ससूनमध्ये पोलिसांच्या पहाऱ्यात राहूनच ड्रॅग रॅकेट चालवत होता आणि त्यासाठी त्याला मोबाईल फोन आणि इतर सगळ्या आवश्यक गोष्टी मिळत होत्या. एवढंच काय तर कोट्यवधी रुपयांचं ड्रॅग देखील त्यानं जवळ बाळगलं होतं. 


राज्यात सुरु असलेल्या या ड्रग्जच्या कारवाईमध्ये अनेक मोठे खुलासे होते आहेत. दरम्यान अशा प्रकारच्या कारवाया करण्यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणत्या कारवाया होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : 


Nashik News : ललित पाटीलच्या भावाचा नाशिकमध्ये ड्रग्ज निर्मितीचा कारखाना, कोट्यवधींचा कारखानाच उध्वस्त, मुंबई पोलिसांची कामगिरी