नाशिक : एखाद्याच्या मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी जास्तीत जास्त किती वर्ष कालावधी जावा लागतो, एक वर्ष, दोन वर्ष... दहा वर्ष? नाही तब्बल 103 वर्ष. नाशिकचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्तक्षेपानंतर 103 वर्षांपूर्वीचं प्रकरण निकाली निघालं.


जुने नाशिकमध्ये राहणाऱ्या निजामुद्दीन नजरअली पिरजादा यांचा 5 फेब्रुवारी 1915 मध्ये मृत्यू झाला. त्याकाळी ब्रिटीश राजवट होती. पिरजादे यांचा दाखला मोडी लिपीत लिहिण्यात आला होता. त्यानंतर देश स्वतंत्र झाला, नाशिक नगरपालिकेची महापालिका झाली. मात्र मृत्यूचा दाखला मिळत नव्हता. ब्रिटीशकालीन दाखले मोडी लिपीत असल्याने, कधी मोडी लिपी वाचक नाही तर कधी अधिकारी नाही अशी वेगवेगळी कारण सांगून अर्जदाराला माघारी पाठवलं जात होतं.

अखेर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे कैफियत मांडल्यानंतर, 103 वर्षांनी निजामुद्दीन पिरजादा यांच्या मृत्यूचा दाखला मिळाला.

निजामुद्दीन नजरअली पिरजादा हे स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्या नावाने ताम्रपत्र सरकारकडून मिळावं, अशी कुटुंबियांची अपेक्षा आहे.



नाशिक महापालिकेच्या रेकॉर्ड रुममध्ये 1879 पासूनच्या नोंदी आहेत. 1897 ते 1934-35 पर्यंतच्या हजारो जन्म-मृत्यूच्या नोंदी मोडी लिपीत आहेत. त्याचं वाचन करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. मध्यंतरी ही जागा रिक्त असल्याने दाखल्यांची काम रखडली होती. मोडी लिपीचं वाचन करुन त्याचं मराठीत भाषांतर केलं जातं. मृत्यूचे कारण, वय, पुरुष अथवा स्त्री अशी सर्व नोंद त्या काळापासून केली जात आहे.

शेकडो वर्षापूर्वीचे अनेक रेकॉर्ड जीर्ण होत चालले आहेत. त्यामुळे या सर्व दस्तऐवजांचं संगणकीकरण करावं, अशी मागणी आता जोर धरत आहे.

सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी म्हण गेल्या काही वर्षात प्रचलित झाली. मात्र मनपाचा कारभार त्याहीपलिकडे जाऊन वर्षानुवर्षे तक्रारदाराला खेटा मारायला लावणारा आहे. त्यात सुधारणा होण्याची आणि जनतेचे आपण सेवक आहोत ही भावना दृढ होण्याची नितांत आवश्यक आहे.