Savarpada Express Kavita Raut: सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत (Kavita Raut) यांनी आपल्यावर आदिवासी असल्याने अन्याय होत असून राज्य सरकारच्या नोकरीसाठी डावलले जात असून सरकार दुजाभाव करत असल्याची भावना माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. 


'आदिवासी असल्यामुळे जातीची शिकार झाले असून, मला शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्यात आलं आहे. शासकीय धोरणाप्रमाणं नोकरीसाठी अनेकदा अर्ज देऊन देखील माझ्या अर्जांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आल्याचं आणि तिच्यापेक्षा कमी गुण आणि खेळात कमी श्रेणी असलेल्या खेळाडूंना शासकीय नोकरी देण्यात आली आहे' असा गंभीर आरोप आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत (Kavita Raut) यांनी सरकारवर केला आहे.


आदिवासी असल्याने अन्याय होत असून राज्य सरकारच्या नोकरीसाठी डावलले जात असून सरकार दुजाभाव करत असल्याचा कविता राऊत यांचा आरोप आहे. धावपटू ललिता बाबरला उपजिल्हाधिकारी पदाची नोकरी देण्यात आली. आपल्याला मात्र 10 वर्ष पाठपुरावा करूनही हाती काहीच मिळाले नसल्याचा दावा कविता राऊत यांनी केला आहे. 


कविताच्या आरोपानंतर आदिवासी लोकप्रतिनिधीनींही सरकारला लक्ष्य केलं आहे. आमदार हिरामण खोसकर आणि माजी आमदार जेपी गावीत यांनी देखील सरकारवर भेदभाव केल्याचे आरोप केले आहेत. सरकार आदिवासी, बिगर आदिवासी असा भेदभाव करत असल्याचा आरोप आजी-माजी आमदारांनी केला आहे. 


आदिवासी 17 संवर्ग पेसा पदभरतीचा मुद्दा चांगलाच चिघळला आहे. जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विकास भवन येथे मागील 4 दिवसांपासून आदिवासी उमेदवारांचे आंदोलन सुरू आहे. कविता राऊत (Kavita Raut) यांनी आदिवासी विकास भवन परिसरात होणाऱ्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे. 


काय म्हणाल्या कविता राऊत ?


माझी ज्युनिअर खेळाडू ललिता बाबर यांनी माझ्याबरोबर पदवी प्राप्त केली. माझ्यापेक्षा कमी पदके असताना देखील गट 'अ' मध्ये त्यांना उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली आहे. पंरतू, माझ्यासोबत जातीयवाद करून 10 वर्षांपासून मला शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.


आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी राष्ट्रकूल स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. शिवाय इतर बऱ्याच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही कविता राऊत यांनी भारताला पदकं मिळवून दिली आहेत. 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून तिनं सहभाग घेतला होता. तसेच कविताला खेळाडूंसाठी देण्यात येणार अर्जुन पुरस्कारही देण्यात आला आहे.