नाशिक : नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत यंदा महिलांचा डंका आहे. आरक्षणानुसार 50 टक्के महिलांना राजकारणात संधी असली तरी नाशिकमध्ये मात्र यंदा 52 टक्क्यांपेक्षाही अधिक महिलांना राजकीय पक्षांनी उमेदवारी देणं पसंत केलं आहे.


विशेष म्हणजे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या महिलांसोबतच नवख्या सुशिक्षित महिलाही यंदा निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळत आहेत. प्रचारापासून उमेदवारीपर्यंत सगळीकडे महिला आघाडीवर आहेत.

विजयाच्या प्रमुख दावेदार म्हणूनही महिला उमेदवारांकडे पाहिलं जातं आहे. मुख्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या यादीतही पुरुष उमेदवारांपेक्षा यंदा महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे हे विशेष.

नाशिकमधील महिला उमेदवारांसबंधी आकडेवारी :

  • शिवसेना (एकूण 122 उमेदवार) – 66 महिला आणि 56 पुरुष

  • भाजप (एकूण 120 उमेदवार) – 64 महिला आणि 56 पुरुष

  • मनसे (एकूण 102 उमेदवार) – 53 ५३ महिला आणि 49 पुरुष

  • काँग्रेस (एकूण 50 उमेदवार) – 26 महिला आणि 24 पुरुष

  • राष्ट्रवादी (एकूण 62 उमेदवार) – 30 महिला आणि 32 पुरुष

  • माकप (एकूण 16 उमेदवार) – 6 महिला आणि 10 पुरुष

  • बसपा (एकूण 36 उमेदवार) – 14 महिला आणि 22 पुरुष

  • भारीप (एकूण 18 उमेदवार) – 6 महिला आणि 12 पुरुष


राजकीय पार्श्वभूमी असलेल्या महिलाप्रमाणेच नवख्या, राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सुशिक्षित महिलाही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत, हे यंदाच्या नाशिकच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे.

31 प्रभागांसाठी 250 पेक्षा अधिक महिला उमेदवार रिंगणात आहेत. विद्यमान 63 नगरसेविकांपैकी 31 महिला नगरसेविका पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. बाकीच्यांचे कुटुंबीय निवडणूक लढत आहेत. त्यामुळे उमेदवार कुणीही असला तरी ठिकठिकाणच्या प्रचारफेऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक सक्रीयपणे महिलाच दिसतात. उन्हातान्हाची काळजी न करता आपल्या पक्षाचा, उमेदवाराचा, निवडणुकीचा अजेंडा घेऊन दारोदार मतदारांच्या भेटी घेत फिरणाऱ्या महिलांनी विरोधकांना धडकीही भरवली आहे.