नाशिक : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दोन व्हिडिओंनी नाशिकमधल्या भाजपची झोप उडवली आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये भाजपचे सचिव नाना शिलेदार हे फॉर्म वाटताना 2 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप होत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओत भाजप नेते गोपाळ पाटील यांनी तिकीट कापल्यानंतर 10 लाख देऊनही तिकीट न दिल्याची नाराजी व्यक्त केली आहे.


मात्र हे विधान ज्याला तिकीट मिळालं, त्या प्रतिस्पर्धी इच्छुकाचं असून, मनसेनं हे कुभांड रचल्याचा आरोप केला जात आहे. जे वाक्य माझ्या मुखात नाही, ते घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा इच्छुकाने केला आहे. वाक्य कुणाचंही असेना, पण नगरसेवकपदाच्या तिकिटासाठी पैसे मोजावे लागतात, हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे.

VIDEO : नाशिकमध्ये भाजपकडून एबी फॉर्मसाठी 2 लाख रुपयांची मागणी


नाशिकमधल्या भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात तिकीट वाटपादरम्यान उमेदवारांकडून दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भाजपचे पदाधिकारी नाना शिलेदार आणि अरूण शेंदुर्णीकर एका उमेदवारांकडून दोन लाखांची मागणी करताना व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहेत.

प्रचार खर्चासाठी दोन लाखांची मागणी करण्यात आल्याचं स्पष्टीकरण भाजप नेत्यांकडून देण्यात येत आहे. नाशिकमध्ये भाजप मध्यवर्ती कार्यालयातली ही व्हिडीओ क्लीप आहे. मात्र, एबीपी माझा व्हिडीओची सत्यता पडताळत असून व्हिडीओ बनवणारी व्यक्ती अद्याप पुढे आली नाही.

एकीकडे नाशिकच्याच भाजपच्या आमदारांना तिकीटं कुणाला दिली याचीच कल्पना नाही. अर्ज माघारी घेण्यासाठी 48 तासांपेक्षा कमी कालावधी असताना पैशांच्या जोरावर उमेदवारीचा घोडेबाजार आणखी रंगणार आहे.