मालेगांव : मालेगांव नाव जरी घेतलं तरी नागरिक आणि यंत्रणेचा थरकाप उडायचा. कोरोनाचा इथे नुसता फैलाव नव्हता तर अक्षरशः थैमान सुरु होते. सुरुवातीपासूनच मालेगांव जिल्हा प्रशासनासमोर मालेगाव एक आव्हान होते. एप्रिल-मे महिन्यात तर सर्वाधिक रुग्ण आढळण्याचा उच्चांक मालेगावने गाठला आणि हा आकडा जून महिन्यात 800 च्या पुढे गेला. पाहता पाहता पावणे नऊशेपर्यंत येऊन ठेपला. मालेगांव शहर आणि मालेगांव तालुक्यातील ग्रामीण भाग सर्वच ठिकाणी रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढत गेले. मुंबई, पुण्यापाठोपाठ मालेगांवचा हॉटस्पॉट हळूहळू डेंजर झोन बनत गेल्याने, एक वेळ अशी आली की प्रशासन अक्षरश: हतबल झाले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन-तीन वेळा भेट देऊन मिशन मालेगांव हाती घेत असल्याची घोषणा केली आणि तेव्हापासून मालेगाव मिशन मोडमध्ये आले.
मालेगांव हे राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक दाटीवाटी असणणारे शहर. महाराष्ट्रात साधारणत: साडे चारशे लोक प्रती चौरस किलोमीटरमध्ये राहातात तर मालेगांवमध्ये हाच आकडा 19 हजारांचा आहे. राज्य सरकारसाठी हीच चिंतेची बाब होती. त्यामुळेच नव्या अॅक्शन प्लॅनसह मिशन मालेगांव हाती घेण्यात आले होते.
मालेगांवचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग आहेत. पूर्व भाग मुस्लीम बहुल तर पश्चिम भागात हिंदू वस्ती जास्त आहे. या दोन्ही भागाच्या समस्या वेगळ्या असल्याने भौगोलिक रचनेनुसार प्रशासकीय दृष्ट्या दोन्ही भाग वेगळे करण्यात आले. नागरिकांना विश्वासात घेऊन आरोग्य, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय राखत त्रिस्तरीय आरोग्य यंत्रणा उभी करुन आव्हानाचा सामना केला. मालेगांवसाठी इमर्जन्सी सेंटर सुरु करण्यात आले. त्याद्वारे कामाचे वाटप नागरिकांचे प्रबोधन, उपचार, सोयी सुविधा देण्यात आल्या. रमजान पर्व काळात नागरिक घरात राहिल्याचा फायदा झाला.
मालेगांवात लोकसंख्येची घनता जास्त असल्याने शहरात रुग्ण संख्या झपाट्यान वाढत गेली. त्यामुळे नव्या सूक्ष्म नियोजनाची गरज भासू लागली. त्यानुसार सर्वत्र सर्वेक्षण करण्यात आले. मालेगांवसाठी टास्क फोर्सची निर्मिती केली. राज्याच्या इतर भागातील अनुभवी डॉक्टरांचा उपयोग करण्यात आला. डॉक्टर, नर्स, पॅरा मेडिकलस्टाफ अशा अतिरिक्त स्टाफची तत्काळ नियुक्ती करण्यात आली.
200 खाटांचे सरकारी रुग्णालय नॉन कोविड म्हणून राखीव ठेवण्यात आले. अधिग्रहित केलेल्या खाजगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार करण्यात आले. जवळपास 1200 बेडची व्यवस्था प्रशासनाने व्यवस्था करुन ठेवली. ज्यांना शक्य आहे त्यांना होम क्वॉरन्टाईन किवा इतरांना इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईन करण्याचा निर्णय घेतला. खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना इतर आजारांचे उपचार करणे बंधनकारक करण्यात आले. असे एक ना अनेक उपाय करण्यात आले. मालेगांवच्या जनतेमधील अज्ञान, गैरसमज दूर करुन, औषधोपचारवर भर देण्यात आला. आयुर्वेद, होमिओपॅथी औषधांचाही उपयोग केला.
राज्य सरकारच्या मिशन मालेगांवमध्ये सर्वात आघाडीवर पोलीस फौज होती. हजारो पोलीस मालेगांवात दाखल झाले होते. मात्र यातील शेकडो योद्ध्यांना कोरोनाची लागणही झाली. नाशिक ग्रामीण पोलिस दलातील 96 आणि इतर राखीव फोर्स मिळून 184 पोलीस कोरोनाबाधित झाले. तर तीन पोलिसांचा मृत्यू झाला. पोलीस दलासाठी हा अत्यंत कठीण काळ होता, पण या परिस्थितीत पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्यासह इतर अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरले आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले. मालेगांवमध्ये आधीच्या तुलनेत नवीन रुग्ण दाखल होण्याचं प्रमाणही कमी झाले. सूतगिरणी हळूहळू सुरु करुन जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पण अजूनही संकट टळलेले नसल्याने नागरिकांना खबरदारी घेण्याची गरज आहे.