नाशिक : मैत्री निभावण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावल्याची अनेक उदाहरणं आजपर्यंत महाराष्ट्रात समोर आली आहेत मात्र याच मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना नाशिकमध्ये घडली आहे. शहरातील उपनगर परिसरात राहणाऱ्या आणि गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांच्या वॉंटेड लिस्टमध्ये असणाऱ्या अक्षय कटारे या आरोपीच्या मुंबई नाका पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या आहेत. नाशिकच्या उपनगर, आडगाव, मुंबई नाका आणि सायबर पोलिस ठाण्यात त्याच्यावर फसवणुक आणि चोरीचे चार गुन्हे दाखल असून तो काही केल्या पोलिसांच्या हाती लागत नव्हता. विशेष म्हणजे दहावी नापास असलेला अक्षय गुन्हा करण्यासाठी मित्रांचाच विश्वासघात करायचा. मित्रांचा मोबाईल चोरी करत त्यांच्या आई वडिलांना फोन करुन विविध कारणे सांगत त्यांच्याकडून तो पैसे उकळायचा.


अक्षय कटारे हा काही वर्षांपूर्वी नाशिकच्या एचपिटी कॉलेजमधील एका कँटीनमध्ये काम करायचा, याच कॉलेजमधील संजय उज्जेनकर या सुरक्षा रक्षकासोबत त्याची चांगली मैत्री जमली होती. भावाचे लग्न आहे त्यासाठी पैसे लागतायत असे सांगत अक्षयने संजय यांच्याकडून 12 हजार रुपये उकळले होते आणि त्यानंतर तो गायब झाला होता. अनेक महिने उलटूनही त्याने संजय यांचे पैसे परत केले नव्हते आणि तीन महिन्यांपूर्वी अक्षयने अचानक संजय यांचे घर गाठले, त्याने पैसे तर परत केले नाहीच याउलट संजय यांचा मोबाईल लंपास केला आणि त्यासाठी त्याने एक अजब शक्कल लढवली होती. माझ्या मावशीकडून तुम्हाला मी पैसे घेऊन देतो माझ्यासोबत चला असं आश्वासन देत तो संजय यांना आपल्या सोबत दुचाकीवर घेऊन गेला होता. मात्र मावशीला फोन करण्याचा बहाना करत त्याने रस्त्यातच गाडी थांबवून संजय यांचा मोबाईल घेतला होता आणि फोनवर बोलत असल्याचं भासवत तो काही वेळातच फरार झाला होता.


अक्षयने त्याचाच अजून एक मित्र मानस परमारचा मोबाईल पळवला होता मात्र मानस वेळीच सावध झाल्याने अक्षय पोलिसांच्या हाती लागू शकला. काही वर्षांपूर्वी अक्षय आणि मानस हे दोघेही एका वस्तीगृहात सोबत रहायचे, अनेक महिन्यांपासून त्यांची भेट नव्हती मात्र दोन दिवसांपूर्वी अचानक अक्षयने त्याला फोन करुन त्र्यंबक नाक्यावरील पिनॅकल मॉलजवळ भेटायला बोलावले. मी एक नविन उद्योगधंदा सुरु करतोय तुझी मला मदत लागेल असं सांगत त्यांच्या बऱ्याच काळ गप्पा रंगल्या मात्र काही वेळातच मला एक कॉल करायचा आहे तुझा मोबाईल दे असं म्हणत अक्षय मानसचा मोबाईल घेऊन चालत चालत मॉलमध्ये गेला. जवळपास दिड तास वाट बघूनही अक्षय बाहेर न आल्याने मानसने मॉलमध्ये जाऊन पाहणी केली असता तो कुठेच निदर्शनास आला नाही आणि हे सर्व संशयास्पद वाटताच मानसने मुंबई नाका पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे एकीकडे पोलिस अक्षयचा शोध घेत असतांनाच दुसरीकडे अक्षयने मानसच्या मोबाईल वरून मानसच्या नातेवाईकांना फोन केले होते. 'भद्रकाली पोलिसांनी मानसला अटक केली आहे त्याला सोडवण्यासाठी पैसे लागत आहेत' असे सांगत पैसे उकळण्याचा प्रयत्न त्याने केला यासोबतच मानसच्या बायकोकडून त्याने काही पैसे देखील ऑनलाईन व्यवहार करत मागवून घेतले होते.

दरम्यान गुप्त माहितीद्वारे सापळा रचून पोलिसांनी अत्यंत शिताफीने अक्षयला बुधवारी बेड्या ठोकल्या. मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनूसार आरोपीने आतापर्यंत चार मित्रांना हजारो रुपयांचा गंडा घातलाय. मित्रांच्या कुटुंबातील सदस्यांना 'तुमच्या मुलाचा अपघात झालाय किंवा त्याला पोलिसांनी पकडलय त्यासाठी पैसे पाठवा' असं म्हणत तो फोन पे किंवा पेटीएमवर पैसे मागवून घ्यायचा आणि पैसे येताच ते पैसे काढून तो मित्रांचे मोबाईल विकून टाकायचा. अक्षयकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात असून पुढील तपास पोलिस करत आहेत. मात्र हा सर्व प्रकार म्हणजे मित्रांवर विश्वास ठेवतांना विचार करा आणि काळजी घ्या असं म्हणायला भाग पाडणारा आहे.