नाशिक : मालेगावमध्ये एका मनोरुग्णाने शहीद स्मारकाचे उद्घाटन केले आहे. मनोरुग्ण व्यक्तीने स्मारकावर झाकलेला कपडा काढून टाकत चाबूतऱ्यासह या स्मारकाची साफ-सफाई केली. त्यानंतर त्याने पुष्पहार अर्पण केला. या उद्घाटनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
शरहातील किदवाई रोडवरील शहीदो की यादगार चौकात शहीद स्मारक भरण्यात आले आहे. स्थानिक राजकारण आणि वाद व प्रशासकीय मंजुरीमुळे स्मारकाचे उद्घाटन अनेक वर्षापासून रखडले होते. त्यामुळे स्मारक कपड्याने झाकून ठेवले होते. दोन तीन दिवसांपूर्वी एक मनोरुग्ण स्मारकावर पोहचला, अंगातील शर्ट काढून त्याने स्मारकाची साफ सफाई केली. त्यानंतर पुष्पहार अर्पण करून स्मारकाचे उद्घाटन केले. यावेळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
मनोरूग्णाचे कौतुक
एवढ्या वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या या स्मारकाचे उद्घाटन मनोरूग्णाने केले. त्याआधी त्याने स्वत:च्या अंगातील शर्टने स्मारक आणि स्मारकाचा संपूर्ण चबुतरा स्वच्छ करून घेताला. त्यानंतर स्मारकाला पुष्पहार अर्पण केला. एका मनोरूग्णाला एवढे कळते तर इतके वर्षे स्थानिक राजकारण्यांना हे कसे कळले नाही, अशी चर्चा सध्या मालेगावात सुरू झाली असून सोशल मीडियावर या मनोरूग्णाचे कौतुक केले जात आहे.
17 वर्षांपासून स्मारक तयार
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगालव शहरातील एटीटी हायस्कूलजवळ किडवाई रोडवर हे हुतात्मा स्मारक बांधण्यात आले. गेल्या 17 वर्षांपासून स्मारक बांधून तयार आहे. मात्र या स्मारकाच्या उद्घाटनासाठी नेत्यांना वेळ नाही. अखेर या मनोरूग्णाने स्मारकाचे उद्धाघटन केले. स्मारकाचे उद्घाटन करून या मनोरुग्णाने हुतात्म्यांच्या बलिदानाचा तर सन्मान केलाच, शिवाय नेत्यांच्या तोंडावर चपराकही मारली.
वादामुळे रखडले उद्घाटन
स्मारक तयार झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित वाद निर्माण झाले. हा वाद काही नगरसेवकांनी न्यायालयात नेला. परंतु, न्यायालयात यावर आजपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. शिवाय स्थानिक राजकारणामुळे स्मारकाचे उद्घाटन रखडले होते. पोलिसांच्या देखरेखीखाली हे स्मारक कापडाने झाकून ठेवण्यात आले होते.
उद्घाटनानंतरही थांबेना वाद
स्मारक उभारल्यापासून सुरू असलेला वाद आता उद्घाटनानंतर देखील थांबण्याचे नाव घेत नाही. कारण ज्या मनोरूग्णाने स्मारकाचे उद्घाटन केले त्याला कोणीतरी तसे करण्यास भाग पाडल्याची चर्चा मालेगाव शहरात सुरू झालीय. त्यामुळे पोलिसांनी या मनोरूग्णाला ताब्यात घेतले असून त्याला असे करण्यास खरंच कोणी भाग पाडलं का? याची चौकशी पोलीस करत आहेत. त्यामुळे आता आणखी नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.