Nashik Ramnavami : धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये (Nashik) रामनवमीनिमित्त (Ramnavami) श्रीराम रथयात्रा काढण्यात येत आहे. श्रीराम रथोत्सव हा नाशिकच्या संस्कृतीचा आणि जुन्या जाणत्या नाशिककरांच्या मनातील आठवणींचा व औत्सुक्याचा विषय असतो. तब्बल सव्वा दोनशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेली रथयात्रा आज शहरातून निघाली आहे. 


श्री रामनवमीच्या (Ramnavami) काही दिवसांनंतर नाशिक शहरातून रामरथ (Shriram rath) काढला जातो. श्रीराम आणि श्री गरुड रथयात्रा हा नाशिकचा लोकोत्सव म्हणून ओळखला जातो. रामनवमी झाली की नाशिकला रथयात्रेचे वेध लागतात. यावेळी अवघे नाशिक दर्शनासाठी गोदाकाठी (Godawari) लोटलेले दिसून येत असते. स्वयंस्फूर्तीने रथयात्रेत सेवा करतात. गोदावरीच्या अविरत प्रवाहासारखी गोदाकाठची ही परंपरा वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या चालते आहे. कामिका एकादशीला रथयात्रा काढण्याची परंपरा पेशवेकाळापासून चालत आली आहे. हा रथोत्सव श्री काळाराम मंदिर (Kalaram Mandir) पूर्व दरवाजा ते पुन्हा राम मंदिर ते पुन्हा राम मंदिर पूर्व दरवाजा असा असतो. 


श्रीमंत माधवराव पेशवे गंभीर आजारी असताना त्यांचे मामा नाशिकचे सरदार रास्ते यांनी रथ काळाराम संस्थानकडे 1785 मध्ये अर्पण केला. त्यामुळे त्याला रास्ते यांचा रामरथ म्हणून देखील ओळखले जाते. तेव्हापासून नवमीला प्रभु श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा केल्यानंतर एकादशीला रामरथ आणि गरुड रथाची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. तब्बल 238 वर्षे ही परंपरा अव्याहतपणे सुरू असून ती नाशिकच्या संस्कृतीचे महत्त्वाचा भाग बनली आहे. रामरथ ओढण्याची जबाबदारी रास्ते आखाडा तालीम संघाकडे, तर गरुड रथ ओढण्याची परंपरा अहिल्याराम व्यायामशाळेकडे असली तरी अन्य शेकडो नाशिककरही मोठ्या आनंदाने हा रथ ओढत मिरवणुकीत सहभागी होतात.


'अशी' सुरु होते राम रथाची मिरवणूक 


नाशिकच्या काळाराम मंदिराच्या पूर्व महाद्वारा समोर उत्तुंग दोन लाकडी रथ केळीचे खांब, दिव्याच्या माळा, फुलांनी सजवून सज्ज असतात. भोगमूर्ती रामरथात तर पादुका गरुडरथात विराजमान होतात. आरती होऊन वाद्यांचा गजर होतो आणि रामराया नगर प्रदक्षिणेला निघतात. रास्ते आखाड्याकडून रामरथ आणि श्री अहिल्याराम व्यायामशाळेकडून गरुडरथ नाड्यांनी म्हणजे मजबूत दोरखंडाने ओढले जातात. भक्तांना रामांच्या आगमनाची वार्ता द्यायला गरुडरथ रामरथाच्या पुढे चालतो. राम रथाची ही मिरवणूक म्हसोबा पटांगणावर आल्यावर तिथे राम रथ थांबतो. प्रभु श्रीराम व्रतस्थ असल्याने ते नदी ओलांडत नाहीत, अशी आख्यायिका आहे. 


संबंधित बातम्या


Nashik News : कुटुंब कामात व्यस्त, इकडं उकळत्या तेलाच्या कढईत लहान मुलगी होरपळली! नाशिकची घटना