नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 2020-21 या वर्षाच्या 'अक्षरयात्रा' या वार्षिक अंकातून अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकमध्ये नियोजित 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कौतिकराव ठाले पाटील यांच्या या सडेतोड लेखामुळे साहित्य क्षेत्र आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 


'त्यांना' शरद पवारांना 'मोठे' करायचे होते : ठाले पाटील
लेखात कौतिकराव ठाले पाटील यांनी म्हटलं आहे की, "शरद पवारांना या संमेलनाचे स्वागताध्यक्ष करुन त्यांना 'मोठे' करायचे होते. तसे ते विविध व्यक्तींची आणि राजकीय नेत्यांची नावे घेऊन दरवेळी पुन्हा पुन्हा मला फोनवर सांगत होते. याचा अर्थ इतके दिवस शरद पवार त्यांच्या दृष्टीने 'लहान'च होते. दिल्लीला संमेलन घेतले तर पंतप्रधानांसह दिल्लीतील इतर नेत्यांमोर हात जोडून, लीन होऊन त्यांचे स्वागत केल्याने, त्यांना हार तुरे घालून व त्यांचा सत्कार केल्यानेच ते मोठे होणार होते. यासंबंधी ते मला वारंवार फोनवर काय काय सांगत होते ते तेच जाणे. त्यासाठी कोणाकोणाची नावे ते फोनवर घेत होते. बिचारे विठ्ठल मणियार, कोण व कुठले हे मला अजूनही माहित नाही. त्यांच्या नावाचा फोनवर अनेक वेळा उल्लेख त्यांनी केला. आणखीही काही नावं सांगितली. मधल्यामध्ये मला माहित नसलेल्या लोकांची नावे ते फुशारकीने का सांगत आहेत हे मला कळत नव्हते. असतीलही ते मोठे. आहेत, हे मी मला माहित नसतानाही मान्य करतो. पण त्यांचा, त्यांच्या मोठेपणाचा आणि साहित्य महामंडळाचा, त्यांचा आणि माझा काय संबंध हे मला कळत नव्हते. स्वागताध्यक्ष होऊन शरद पवार 'मोठे' झाल्याशिवाय आणि मराठी साहित्य संमेलनातून महाराष्ट्राचा मराठी आवाज उत्तरेतील पुढाऱ्यांना ऐकवल्याशिवाय महाराष्ट्राची, मराठी माणसाची दिल्लीत किंमतच वाढणार नव्हती असे काहीसे त्या सर्वांचे म्हणणे होते. त्यांचे हे म्हणणे फोनवरुन मला पटवून देण्याचा तर हा प्रयत्न नव्हता? 'शरद पवारांना लहान करु नका' ही ठळक शीर्षकाची लोकसत्तेतील बातमी काय सुचवते? संमेलनासाठी चाललेला आटापीटाच ना!" 


कौतिकराव ठाले पाटील यांच्या लेखातील काही महत्त्वाचे मुद्दे -  


1. अलीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे काही लोक 'धंदा' म्हणून पाहू लागले आहेत असे माझे निरीक्षण आहे.  


2. संमेलनाला सत्तेतील नेते आणून सरकारी दरबारी अडलेली वैध, अवैध कामे मार्गी लावली जातात किंवा सार्वजनिक हिताच्या नावाखाली नवी कामे पदरात पाडून घ्यायला साहित्य संमेलनाइतके दुसरे चांगले साधन असू शकत नाही.


3. घुमानला संमेलन घेतलेल्या पुण्यातील एका संस्थेला दिल्लीत संमेलन घेऊन शरद पवारांना या संमेलनाचे स्वागताध्यक्ष करुन त्यांना 'मोठे' करायचे होते. शरद पवारांचे सहस्त्रचंद्रर्शन या आशयाच्या बातम्या लोकसत्त्तामध्ये छापून आणल्या.


4. नाशिकला संमेलन होणार असा निर्णय जाहीर होताच दिल्लीसाठी आग्रही असणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षांनी मला फोन केले, धमक्या दिल्या.


5. नाशिकमधील संमेलन कमी खर्चात आटोपशीर पद्धतीने घ्या असे मी आधीच आयोजकांना सुचविले होते मात्र कोटींच्या घरात जाणारे अंदाजपत्रक बघून मी अस्वस्थ झालो. एवढी गरज काय?


6. निधी आणि चुकीच्या वाटणाऱ्या कामांबाबत मला भुजबळ यांच्याशी बोलायचे होते मात्र आयोजक लोकहितवादी मंडळाने तसे होऊ दिले नाही.


7. ज्या तारखांना हे संमेलन घेण्याचे ठरवले होते तोपर्यंत नाशिक शहराने कोरोना संकटाच्या उपद्रवाने रौद्र रुप धारण केले. त्यामुळे या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने भविष्यात निधीवरुन संभवू शकणाऱ्या चर्चेलाही कारण मिळण्याची शक्यता मावळली आणि सूक्ष्म नजरेच्या जागरुक नाशिककरांच्या तोंडी आणि लेखी तक्रारींतून माझी तसंच साहित्य महामंडळाची सुटका झाली.


8. आमच्या सूचनांचे आयोजकांनी पालन केले नाही. भुजबळांनी नाशिक जिल्ह्यातील आमदारांशी बोलून आमदार निधीतून संमेलनासाठी मोठी रक्कम मिळवली. मात्र आमदार निधी साहित्य संमेलनासाठी वापरणे योग्य नाही, नाहीतर हे महाराष्ट्र सरकारचे संमेलन होईल.


9. कोणी 'एकतंत्री' कारभार करत असेल तर त्याला त्यापासून रोखले पाहिजे, ऐकत नसेल तर बाजूला केले पाहिजे. (नाशिक शहरातील आणि जिल्ह्यातील शिक्षण व इतर संस्था, कारखाने, बँका, उद्योजक, कंत्राटदार, हॉटेलमालक, व्यापारी, सरकारी अधिकारी, कर्मचारी, नोकरवर्ग, लेखक, रसिक व सामान्य लोक यांनी आपापल्या ऐपतीनुसार स्वागताध्यक्ष श्री. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली 'निधी' जमा केला पाहिजे; निधी दिला पाहिजे. तो नेटकेपणाने, योग्य पद्धतीने कसा खर्च होईल ते पाहिले पाहिजे. कोणी 'एकतंत्री' कारभार करत असेल तर त्याला त्यापासून रोखले पाहिजे; ऐकत नसेल तर बाजूला केले पाहिजे; तरच नाशिकचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोषरहित करता येईल; ते नाशिककरांचे होईल. अर्थात कोरोनाच्या संकटाने तशी संधी आपणा सर्वांना दिली तरच! नसता हे संमेलन या जीवघेण्या संकटामुळे रद्द होण्याचीच शक्यता जास्त!)


10. मराठी संमेलन हा सर्वोच्च सोहळा आहे. पण या सोहळ्याला कोणी आपल्या सोयीसाठी आणि स्वार्थासाठी वापरु पाहत असेल, चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न करत असेल तर भिडेला बळी न पडता त्याला अटकाव केला पाहिजे.


राजकीय व्यक्तींची काय अॅलर्जी आहे? : हेमंत टकले
कौतिकराव ठाले पाटील यांनी केलेले आरोप हे चुकीचे आहेत. . गैरसमजातून हे आरोप केल्याचं वाटतं. अस झालं असेल तर नक्कीच भेट घेऊन गैरसमज दूर करु, अशी प्रतिक्रिया आयोजक 94 व्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक आणि लोकहितवादी संस्थेचे विश्वस्त हेमंत टकले यांनी दिली.


"आम्ही लोकहीतवादी संस्था नाशिकमध्ये साहित्य संमेलनाचं आयोजन व्हावं यासाठी आग्रही होतो. पुण्यातील संस्थेने दिल्लीत साहित्य संमेलन व्हावं यासाठी आग्रही भूमिका मांडली होती. नाशिकचे पालक मंत्री छगन भुजबळ यांना सर्वांच्या संमतीने स्वागताध्यक्ष करण्यात आलं होतं. नाशिक आणि दिल्लीचा काही संबंध नाही. आम्ही नाशिकसाठी आग्रही आहोत," असं ते म्हणाले.


"हा एक वैयक्तिक झगडा समोर आला आहे. ठाले पाटील यांचं म्हणणं आहे की राजकीय व्यक्तींचा साहित्य संमेलनामध्ये कुठलाही सहभाग नसावा. मला कळत नाही या लोकांना राजकीय व्यक्तींची काय अॅलर्जी आहे? आमदार निधी यासाठी वापरला जाणार होता, त्यासाठीचा पत्र सुद्धा आमदारांनी दिले होते, त्यात गैर काय ? तुम्ही या गोष्टी चुकीच्या का समजता? लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना निधी वापरायचा अधिकार आहे. यामध्ये स्वार्थ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कसला स्वार्थ आहे ते सांगावं?


ठाणे पाटील यांचं म्हणणं होतं की कमी पैशांत हे संमेलन व्हावं. पुण्याच्या संस्थेचं पत्र आमच्याकडे आहे, त्यात आम्ही त्यांना नाशिकसाठी आग्रही असल्याचं सांगितलं. कौतिकराव ठाले पाटील आणि महामंडळच्या पदाधिकारी यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली होती आणि त्यात भुजबळ यांनी त्यांचा सत्कार केला होता. आता ते म्हणतात भेटच झाली नाही. सगळं काही पारदर्शक आहे. कौतिकराव ठाले पाटील यांची मी भेट घेऊन गैरसमज दूर करेन. त्यांचं म्हणणं समजून घेऊ. याआधी सुद्धा मी त्यांना भेटलोय. त्यांनी हे आरोप का केले माहित नाही, त्यांचा गैरसमज झाला असं मला वाटतं. त्यांना धमकी कोणी दिली याबाबत माहिती नाही."