नाशिक : मुंबईला पाणी पुरवणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या वैतरणा धरणांतलं पाणी विषारी झालं आहे. अवैध मासेमारी करणाऱ्या काही व्यावसायिकांकडून वैतरणा धरणात सातत्यानं विषारी औषधं फवारली जात आहेत. त्यामुळे या धरणांतील पाणी विषारी होतं आहे सोबतच मोठी पर्यावरणीय हानीही होत आहे. अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या या धरणाची सुरक्षितताही रामभरोसेच आहे. 


मुंबईकरांच्या जीवाशी आणि आरोग्याशी खेळ कऱण्याचा प्रयत्न नाशिक जिल्ह्यातल्या वैतरणा धरणांत खेळला जातोय. झिंगे, मासे पकडण्यासाठी अवैध मत्स्य व्यावसायिक करणाऱ्या काही लोकांकडून वैतरणाच्या पाण्यात विषारी औषध फवारलं जात आहे. धरणकाठी गावात आजारांची साथ आली. त्यामुळे इथलं वैशिष्ट असलेला कोंबडा मासाही नामशेष झाला आहे. शेतातली खतं निरुपयोगी ठरु लागल्यावर हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. मात्र पाटबंधारे, जलसंपदा, पोलीस आदी शासकीय विभागांनी पूर्णपणे डोळेझाक केल्यामुळे हा प्रकार सर्रासपणे सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.


वैतरणा धरणाच्या पाण्याजवळ गेले की या विषारी औषधाची दुर्गंधी सहजपणे अनुभवायला मिळते. मांसाहारी लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या झिंग्याला मोठी मागणी आहे. निर्यातीत 200 रुपये प्रति किलोचा भाव मिळत असल्यानं मत्स्य व्यवसायातील नाशिकमधल्या काही माफीयांनी आपला मोर्चा वैतरणाकडे वळवला.


स्थानिक आदिवासी मच्छिमार संस्थांच्या काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन त्यांनी हा उद्योग सुरु ठेवला आहे. गावकऱ्यांच्या विरोधामुळं सध्या मध्यरात्री गाड्या घेऊन यायच्या आणि विषारी औषधाने मेलेले मासे, झिंगे जमा करुन घेऊन जाण्याचा उद्योग सुरु आहे. हे प्राणी किनाऱ्यावर येऊन अडकावे म्हणुन काही धोकादायक वनस्पतीही मोठ्या प्रमाणावर टाकण्यात आल्या आहेत. ज्यात अडकून अनेक युवक आणि प्राण्यांचा मृत्यु झाल्याचंही गावकरी सांगतात.


मुंबईकरांच्या पाण्यात विष कालवलं जात असल्याची तक्रार खुद्द वैतरणा धरण उपविभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी घोटी पोलीस ठाण्यात केली आहे. मात्र तेरी भी चुप मेरी भी चुपचा व्यवहार सुरु आहे. दीड महिना उलटूनही यावर कारवाई करण्यात आलेली नाही. एबीपी माझानं संपर्क साधल्यावर एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर अधिकृत भाष्य करण्यास नकार दिला.


 


धरणाच्या सुरक्षेची आणि व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांची या धरणाकडे पाहण्याची दृष्टी धक्कादायक आहे. 'एबीपी माझा'ची टीम याठिकाणी पोहोचली तर 22 पैकी एकही कर्मचारी कार्यालयात उपस्थित नव्हता. अत्यंत महत्वाच्या असलेल्या या धरणांची व्यवस्था पाहणाऱ्या कार्यालयाला टाळं होतं. अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या धरणाच्या व्यवस्थाप्रमुखांचा कामचुकारपणा गंभीर होता.


 


मध्यंतरी नाशिक जिल्ह्यातली धरणं अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याचा अहवाल गुप्तचर विभागानं दिला होता. त्यानंतर महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या माध्यमातून सुरक्षारक्षक कंत्राटी पध्दतीनं भरले गेल्याचं बोललं गेलं. मात्र एबीपी माझाच्या पाहणीत थेट धरणाच्या पाणी विसर्ग करणाऱ्या मोऱ्यांवर गेलं तरी या ठिकाणी एकही सुरक्षारक्षक आढळून आला नाही.


 


धरण असो की धरणातलं पाणी काहीही सुरक्षित नाही अशी वैतरणा धरणाची परिस्थिती आहे. इथल्या पाण्यात विष कालवणाऱ्यांना झिंगे निर्यात करुन महिन्याला काही कोटींचा फायदा होत असल्याची चर्चा आहे. यातला अर्थपुर्ण फायदा असल्यामुळं मुंबईकरांच्या पाण्यात विष कालवणाऱ्यांना पोलीस आणि जलसंपदा खात्यातील काही अधिकारीही पाठिशी घालत असल्याचं दिसतंय. सरकारनं वेळीच याची दखल घेतली नाही तर भविष्यात मुंबईकरांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो.