नाशिक : नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी बेपत्ता झाल्यानंतर घरी परतलेले अभियंते रवींद्र पाटील यांच्याबाबत पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केलं आहे. रवींद्र पाटील घर सोडून गेले तेव्हाच मी बोललो होतो की ते परत येतील. पळून जाणं, प्रेशर आणणं हे सोडा. तुम्ही हे स्वत: करत आहात की तुमच्याकडून हे कोणी करवून घेतंय. तुम्हा काम नाही केलं तर तुमच्यावर कारवाई होणारचं असा सज्जड दम तुकाराम मुंडे यांनी अधिकाऱ्यांना भरला आहे.
बुधवारी दाभोलकर-विवेक या व्याख्यानमालेत सविस्तरपणे पहिल्यांदाच आपली बाजू मांडली. महापालिकेचे अधिकारीच माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. मात्र दोषी आढळणाऱ्या एकाही अधिकाऱ्याला मी सोडणार नाही, अशा शब्दात मुंढेंनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेचे नगररचना विभागाचे अभियंते रवींद्र पाटील बेपत्ता झाले होते. यावरुन मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर टीका झाली होती. यावेळी मुंडे म्हणाले की, 'सिडकोतील कारवाई ही संवादाच्या अभावातून झाली होती. मात्र त्यात आपली काही चूक नसताना फक्त माझ्या अधिकाऱ्यावर कारवाई होऊ नये, यासाठी मी कोर्टात माफी मागितली.'
'माझ्यामुळे कामाचा ताण तणाव कमी झाला आहे. मी कायद्यानुसार ३० दिवसाच्या आत फाईल पूर्ण करायला लावतो. याचं अधिकाऱ्यांना दडपण आलं असावं', असा टोला मुंडे यांनी लगावला. अधिकाऱ्यांचा बोलविता धनी कोणीतरी दुसरा असावा, असं म्हणत काही स्थानिक नेते आणि लोकप्रतिनिधींवरच मुंडे यांनी संशय व्यक्त केला.
'माझ्यामुळे ब्लॅकमेलर्स कमी झाले आहेत, अधिकाऱ्यांना कामाव्यतिरिक्त इतर उद्योग करता येत नाहीत. यामुळेही त्यांच्यावर ताण तणाव वाढला का? हा संशोधनाचा विषय असून, याची चौकशी करून जे दोषी असतील त्यांना सोडणार नाही असा दम मुंडे यांनी अधिकाऱ्यांना भरला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
रवींद्र पाटील शनिवारी 26 मे रोजी सकाळी वॉक विथ कमिशनर कार्यक्रमासाठी जात असल्याचे सांगून बाहेर पडले. मात्र थोड्या वेळाने त्यांची पत्नी फ्लॅटमधून खाली आल्यावर, त्यांना रवींद्र पाटील यांची गाडी पार्किंगमध्येच दिसली. त्यात मोबाईल,न डायरी आणि एक चिट्ठी आढळून आली.
या चिट्ठीत कामाच्या अधिक ताणामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी नमूद होती. त्यामुळे घाबरलेल्या पाटील कुटुंबीयांनी तातडीने पोलिसात धाव घेत, फिर्याद दिली. पोलिसांनी गाडीची पाहणी करून, धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यानंतर पाटील यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली. अखेर सहा दिवसांनी रवींद्र पाटील घरी परतले होते.
ग्रीन फील्ड लॉन्सवरच्या कारवाईमुळे महापालिका प्रशासनाला उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले होते. न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही, अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली होती. या कारवाईमुळे महापालिकेत एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याची स्पर्धा सुरु झाली. त्याच तणावातून रवींद्र पाटील घराबाहेर गेल्याची चर्चा नाशिकमध्ये होती.