नाशिक : मुंबई-नागपूर प्रस्तावित समृद्धी महामार्ग प्रकल्पबाधित गावांनी काळे आकाश कंदील उभारुन राज्य सरकारची निषेध केला. जमीन हस्तांतरणाच्या भितीमुळं जिल्ह्यातील शिवडे, डुबेरे, सोनांबेसह अनेक गावांतल्या शेतकऱ्यांनी यंदा काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला.


समृद्धी महामार्गाला सुरुवातीपासूनच नाशिक आणि इगतपूरी भागातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. एप्रिल महिन्यात प्रस्तावित महामार्गासाठी जमीन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर शिवडे येथील शेतकऱ्यांनी दगडफेक केली. इतकंच नाही तर काही शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत जाळपोळही केली होती.

शेतकऱ्यांनी आपला विरोध अद्याप कायम ठेवला असून, यंदाची दिवाळी काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला आहे. नाशिकमधील शिवडे, डुबेरे सोनांबे आदीसह अनेक गावातील शेतकऱ्यांनी गावाच्या मध्यभागी काळा आकाश कंदील लावून सरकारबद्दल रोष व्यक्त केला आहे.

सुपीक जमिनी जाणार असल्यामुळे आपण यंदा दिवाळीच साजरी केली नसल्याचं येथील शेतकऱ्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.