नाशिक : सोशल मीडियावर आलेल्या सैन्य भरतीच्या अफवेवर विश्वास ठेवत नाशिकच्या देवळाली कॅम्पला पोहचलेल्या हजारो युवकांना रविवारी रात्री खूप मनस्ताप सहन करावा लागला. भरती तर झालीच नाही पण ऐन दिवाळीत शिमगा करण्याची वेळ राज्यभरातून आलेल्या युवकांवर आली.




सैन्य भरती प्रक्रिया राबवल्या जाणाऱ्या देवळाली कॅम्पमध्ये सोमवारी पहाटेपासून 116 इन्फंटरी बटालियन प्रादेशिक भरती होणार असल्याचा मेसेज गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर विश्वास ठेवून राज्यभरातले हजारो युवक रविवारी रात्रीच देवळाली कॅम्पमध्ये पोहोचले.

तरुणांचे लोंढेच्या लोंढे धडकू लागल्याने कॅम्प परिसर गजबजला. मात्र भरतीबद्दल कुठलीच अधिकृत माहिती न मिळू लागल्याने गोंधळ उडाला. सैन्य प्रशासनाला विचारणा होऊ लागल्याने "अशी कुठलीही भरती नसल्याचा फलकच" प्रशासनाने कार्यालय बाहेर लावला.


त्यामुळे घरातून आणलेल्या भाकरी खात आणि अफवा पसरवणाऱ्यांचा निषेध करत सैन्य भरतीसाठी आलेल्या युवकांनी परतीचा रस्ता धरला. तरुणांच्या गर्दीमुळे रेल्वे स्टेशन परिसर मध्यरात्री गजबजून गेला होता.