नाशिक : सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात नाशिक शहरात गुन्हेगारीने चांगलच डोकं वर काढलं आहे. आता तर थेट पोलिसांच्याच नावाने वृद्ध नागरिकांची भरदिवसा लूटमार केली जातीय. विशेष म्हणजे त्यासाठी अनोखी शक्कल लढवली जात असून यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.
नाशिक शहरातील राजीवनगर परिसरात क्राईम ब्रान्चचे अधिकारी असल्याचं सांगत एका वृद्धाचे तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही लुटमार करण्यासाठी या तोतया पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली होती. राजीवनगर परिसरात राहणारे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सेवानिवृत्त अधिकारी अनंत कुडे हे रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आपल्या घरून मित्राकडे रस्त्याने पायी जात होते. त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना अडवत आम्ही क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगत या ठिकाणी दोन नंबरचा व्यवसाय करणाऱ्या एकाच्या शोधात आहोत. त्याला लवकरच पकडू तुम्हीही आम्हाला सहकार्य करा असे सांगत त्यांना विश्वासात घेतले.
यावर तुम्ही पोलीस खूप चांगले काम करताय असे म्हणत कुडे यांनी तोतया पोलिसांचे कौतुक करताच त्यांनी काकांचे आभारही मानले. या तिघांमध्ये बातचीत सुरु असतानाच या परिसरातून वावरणाऱ्या एका तरुणाला या इसमांनी आपल्याकडे बोलवत त्याची झडती घेतली तसेच त्याच्या खिशातून काही नोटांचे बंडल काढत आपल्या जवळील एका रुमालात ठेवून त्या तरुणाला घटनास्थळावरुन निघून जाण्यास भाग पाडले. यानंतर कुडे यांनाही गळ्यातील चेन आणि अंगठी काढण्यास त्यांनी सांगितली. त्याप्रमाणे कूड यांनी देखील आपल्या गळ्यातील चेन आणि अंगठी असे जवळपास सव्वा लाख रुपयांचे दागिने त्यांच्याकडे सोपवताच त्यांनी या ठिकाणाहून पळ काढला.
मात्र काही वेळातच कुडे यांना आपली लुटमार झाल्याचं लक्षात येताच त्यांनी इंदिरानगर पोलिसांशी संपर्क साधला. त्यांना सर्व प्रकार कथन केला आणि स्वतः पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांसह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. झालेल्या या सर्व प्रकारानंतर पोलीस देखील चक्रावून गेले असून आरोपींच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. इंदिरानगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी ठकबाजीच्या गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी लवकरत हाती लागतील असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जातोय.
लॉकडाऊनमुळे शहरात सर्वत्र विशेष पोलीस फौजफाटा तैनात केला गेलाय. मात्र तरी देखील गेल्या काही दिवसांपासून प्राणघातक हल्ले, चोऱ्या, घरफोडी या गुन्ह्यात कमालीची वाढ होत असल्याची समोर आलं आहे. आता तर थेट पोलिसांच्याच नावे नागरिकांना गंडा घातला जात असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जातय.
VIDEO | मंदीत संधी! नोकरी गमावलेल्यांसाठी शेळीपालन उत्तम पर्याय,लहान जागेत शेळीपालन करणं शक्य,स्थलांतरितांसाठी मोठी संधी