...तर भुजबळ कुटुंबियांच्या मालमत्तेचा लिलाव होणार
समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ संचालक असलेल्या 'आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर' कंपनीचं साडेचार कोटींचं कर्ज थकीत आहे.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय 'दि नाशिक मर्चंट्स' सहकारी बँकेने घेतला आहे. समीर भुजबळ आणि विद्यमान आमदार पंकज भुजबळ संचालक असलेल्या 'आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर' कंपनीचं 1 ऑक्टोबर 2017 पासून बँकेचं साडेचार कोटींचं कर्ज थकीत आहे.
या थकीत कर्जवसुलीसाठी नाशिक मर्चंट्स सहकारी बँकेनं भुजबळ कुटुंबियांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 30 नोव्हेंबर रोजी 4250 चौरस मीटर क्षेत्राच्या पाच बिनशेती मिळकती आणि 600 चौरस मीटर क्षेत्रफळाचे कार्यालय यांची लिलावाद्वारे विक्री करण्याचे बँकेने जाहीर केलं आहे.
'आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर'चे कंपनीला र्मचट्स बँकेने 4 कोटी 34 लाखांचं कर्ज दिलं होतं. मात्र त्याची परतफेड न केल्याने बँकेने आधी जप्तीची नोटीस बजावली होती. त्यानंतर समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांनी कुठलीच पावलं उचलली नसल्यानं बँकेने लिलावाची नोटीस बजावली आहे.
दरम्यानच्या काळात भुजबळ कुटुंबियांकडून कर्जाची परतफेड केली तर लिलावाची नामुष्की टळू शकते, असं बँकेने स्पष्ट केलं आहे.