Nashik News: नाशिक जिल्ह्यात अवकाळी फेरा सुरूच असून यामुळे वित्तहानीसह जीवितहानी होण्याच्या घटना वाढत आहेत. आज सायंकाळी झालेल्या पावसात सिन्नर तालुक्यात रामपूर जवळील पुतळेवाडी परिसरात दुर्दैवी घटना घडली आहे. वीज पडून विवाहितेचा मृत्यू झाला आहे.
नाशिकसह जिल्ह्यातील अनेक भागात मागील आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पिकांच्या अतोनात नुकसानासह वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. एकट्या पेठ तालुक्यातील आठशेहुन अधिक घरांची पडझड झाली आहे. वीज पडून अनेकांचा मृत्यूही झाला आहे. अशातच सिन्नर तालुक्यात पुन्हा एकदा वीज पडून दुर्दैवी घटना घडली आहे. सिन्नर तालुक्यातील रामपूर पुतळेवाडी येथे झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच वीज कोसळल्याने वैशाली विजय कवडे या गतप्राण झाल्या आहेत. रामपूर भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वैशाली विजय कवडे असे मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
सिन्नर तालुक्यातील रामपूर पुतळेवाडी परिसरात विजांच्या गडगडाटात पावसाला सुरू झाली. पूर्व भागातील अनेक गावात पावसाने हजेरी लावली होती. रामपूर परिसरातही सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. पाऊस आल्याने वैशाली कवडे या घराच्या अंगणातील लिंबाच्या झाडाजवळ वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, त्याचवेळी झाडावर वीज कोसळल्याने वैशाली यांनाही विजेचा जोरदार झटका बसला. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, पती व सासू असा परिवार आहे.
अवकाळी पावसामुळे सहा दिवसात 23 हजार 699 हेक्टरवरील शेतीचे नुकसान
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली असून नाशिक (Nashik) जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे गेल्या सहा दिवसात झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल एबीपी माझाच्या हाती आला आहे. अवकाळी पावसामुळे नाशिकमध्ये 23 हजार 699 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. 467 गावातील 36 हजार 442 शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.
अवकाळी पावसात सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला आहे. तब्बल 18 हजार 346 हेक्टवरील कांदा भुईसपाट झाला आहे. शेतात पावसामुळे पाणी साचलंय, त्यामुळे काढणीला आलेला कांदा पाण्यात भिजल्याने सडला आहे. कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कांद्याखालोखाल, भाजीपाला, डाळिंब, द्राक्ष आणि आंबा फळाला फटका बसला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: