Nashik News :  सकाळच्या सत्रातील शाळा होती म्हणून बरं झालं, पाऊस यायच्या आधी घरी गेली होती. सायंकाळी पाऊस आला आणि अनेक शाळातील पत्रे उडाले, कुठे भिंत खचली. वर्गात पाणीच पाणी झालं.दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत येऊन पाहतो अशी परिस्थिती होती. सगळ्या मुलांना मंदिरात नेऊन त्या दिवशीचा वर्गही घेतला अन् गावकरी मिळून जिथे शक्य होईल तिथे दुरुस्ती केली. जर का दैनंदिन शाळा सुरू असती तर मोठा अनर्थ झाला असता, मात्र सुदैवाने तसं झालं नाही, अशा शब्दांत त्या दिवशीच्या भयानक पावसाचा प्रसंग अभेटी येथील प्राथमिक शाळा शिक्षिका गावित यांनी कथन केला.


नाशिक जिल्ह्याला सलग तीन दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढले असून पेठ तालुक्याला सर्वाधिक फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील कुळवंडी, घनशेत, अभेटी, शेवखंडी, बर्डापाडा, आमलोण आदी परिसरात सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास जवळपास एक तास तुफान गारपीट झाली. आजवर कधीही न ओढावलेली परिस्थिती गावकऱ्यांनी अनुभवली. पाऊस दिसतच नव्हता फक्त भल्यामोठ्या गारा या पडत होत्या. जो तो आपला जीव मुठीत धरून बसला होता. गारपीटीमुळे या गावातील शेकडो घरांची पडझड झाली आहे, अनेक झाडावरील आंबे गळून पडले आहेत. विशेष म्हणजे तीन दिवस उलटूनही गारांचा खच ईथे बघायला मिळत असून गारा अजूनही वितळलेल्या नसल्याची परिस्थिती आहे.


दरम्यान अभेटी, आमलोण, बर्डापाडा आदी गावातील घरांची पडझड तर झालीच मात्र येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची गारपिटीने दुर्दशा झाली आहे. या तीनही शाळांचे पत्रे, कुठे कौल दूरवर फेकले गेले आहेत. कुठे शाळेची भिंत खचली आहे, अनेक वर्ग हे गारांसह पाण्याने भरले आहेत. त्यामुळे सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळेत जेव्हा दुसऱ्या दिवशी शिक्षक आणि विद्यार्थी आले तेव्हा भयानक परिस्थिती पाहायला मिळाली. शाळा, वह्या पुस्तके, शाळेचे साहित्य सगळे भिजलेले होते. कुठेच बसायला जागा नव्हती, शाळेवरील छत शिल्लक नव्हतं.


बर्डापाडा येथील प्राथमिक शाळेचे जुन्या इमारतीवरील पत्र्यांसह नवीन शाळेच्या इमारतीवरील पत्रे देखील उडविले. विशेष म्हणजे या नव्या इमारतीचे अद्याप उदघाटनही झाले नव्हते. मात्र अशातच अवकाळीसह बरसलेल्या गारपिटीने शाळांचे अतोनात नुकसान केले आहे. या शाळेला लागूनच 1985 पासूनची अंगणवाडी  देखील अशीच दुर्दशा झालेली पाहायला मिळाली. अनेकदा गारपीट झाली, पाऊस झाला, अस होत नव्हतं, मात्र या तासाभराच्या अवकाळी पावसाने सगळं छतच उचलून नेले आहे, आता अंगणवाडीचे साहित्य दुसऱ्या घरी नेऊन ठेवत असल्याचे अंगणवाडी सेविकेने सांगितले. 


तोपर्यंत मुलं घरी गेली होती!


तर दुसरीकडे आमलोन आणि अभेटी येथील शाळांची काही वेगळी परिस्थिती नव्हती. आमलोण येथेही प्राथमिक शाळा असून आजूबाजूच्या पाड्यावरील विद्यार्थी शाळेत येत असतात. सध्या सकाळच्या सत्रात शाळा भरत आल्याने त्यादिवशी नेहमीप्रमाणे मुलं दुपारी बारा वाजता घरी गेली. मात्र सायंकाळी चार वाजेच्या सुमारास झालेल्या गारपीटीमुळे आमची शाळा उद्धवस्त केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तर अभेटीत अशीच परिस्थिती होती, येथील शिक्षिका श्रीमती गावित यांनी सांगितले की, आमची शाळा तशी जुनीच आहे, अनेक पावसाळ्यात छतातून पाणी गळत असते, अशावेळी  गावकरी येऊन दुरुस्ती करून देतात. मात्र सोमवारी झालेल्या कधीही न पाहिलेल्या पावसामुळे शाळेचे खून नुकसान झाले आहे. सुदैवाने सर्व मुले घरी गेल्याने काही झालं नाही, अन्यथा अनर्थ झाला असता. आज आम्ही काही गावकऱ्यांकडून दुरुस्ती करून घेतली आहे. मात्र शासनाने ग्रामीण भागात आता नव्या इमारती बांधून देणं अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले.