नाशिक : येवला तालुक्यातील (Yeola Taluka) पूर्व भागात भीषण अशी पाणी टंचाई (Water Scarcity) जाणवू लागली आहे. नदी, नाले, बंधारे, धरण आदी कोरडे ठाक पडल्याने विहिरींनीही तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत असून पाणी विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांवर येवून ठेपली आहे. येवला तालुक्यात सध्या 118 गाव-वाड्यांना 56 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा (Water Supply) करण्यात येत आहे. 


येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर, भारम, कोळम, खरवंडी आदी पूर्व भागात सध्या भीषण अशी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या भागात गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस ना झाल्याने शेती पिके पाण्याअभावी उद्ध्वस्त झाली आहेत. शेतीपिकांची लागवड होते मात्र पिके पाण्याअभावी करपून जात आहेत.  बळीराजाच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. यंदा तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील ग्रामस्थांना भटकंती करावी लागत असून वेळप्रसंगी पाणी विकत घ्यावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची भीषण अशी पाणी टंचाई जाणवत असल्याने ग्रामस्थांना केवळ पाण्यासाठी शहराकडे स्थलांतर करण्याची वेळ येवून ठेपली आहे. 


हंडाभर पाण्यासाठी हातपंपाजवळ मुक्काम


आदिवासी वस्तीवर यापेक्षाही भीषण वास्तव आहे. पाण्याचा कुठलाही स्रोत नाही. केवळ एका हातपंपावर तहान भागवावी लागत आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत या हातपंपाचे पाणी देखील कमी पडल्याने दोन-दोन तास त्या हातपंपावर नंबर लावून बसावे लागते. तेव्हा कुठे एखादा हंडा पाणी मिळतं. कधी कधी तर रात्री या हातपंपावरच हंडाभर पाण्यासाठी रात्रीचा मुक्काम ठोकण्याची वेळ येते, अशी विदारक परिस्थिती ममदापूर या गावातील आदिवासी वस्तीवर आहे. तर 60 रुपयात दोनशे लिटर पाणी विकत घेण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. 


पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी 


 मंत्री छगन भुजबळ यांचा येवला हा मतदारसंघ असून येवल्याच्या पूर्व भागात दरवर्षी भीषण अशी पाणीटंचाई निर्माण होत असते. त्यामुळे या भागात कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी. परिसरातील धरणातून ती व्यवस्था व्हावी अशी मागणी येवल्याच्या पूर्व भागातील ग्रामस्थांनी केली आहे. 


नाशिक शहरातही पाणीटंचाईची समस्या गंभीर


दरम्यान, नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होताना पाहायला मिळते आहे. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी सात ते आठ तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र शहरी भागात देखील आता टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील उच्चभ्रू वस्ती देखील आता टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरला मागणी वाढल्यामुळे आता टँकरच्या किमतीमध्ये देखील जवळपास दोनशे ते चारशे रुपयांनी वाढ झाली आहे. 


आणखी वाचा 


Gangapur Dam : नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा खालवला, पाणी टंचाईचं संकट अधिक गडद