नाशिक : खरीप हंगाम 2024 (Kharif Season 2024) करिता जिल्ह्यात खते व बियाणे यांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता असून, शासनाकडून खतांचे एकूण 2.21 लाख मे. टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. तसेच कृषी निविष्ठाच्या विक्रीसंदर्भात नियंत्रण ठेवण्याकरिता 17 भरारी पथकांची नियुक्ती केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) कृषी विकास अधिकारी माधुरी गायकवाड (Madhuri Gaikwad) यांनी दिली आहे.


जिल्ह्याकरिता कापूस, भात, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, भुईमुग, तुर, मुग व उडीद, इ. पिकांच्या मागणीनुसार बियाणे पुरवठा सुरु झाला आहे. जिल्ह्यात खते व बियाणे यांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता होत आहे. खरीप हंगाम 2024 करिता शासनाकडून युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खतांचे एकूण 2.21 लाख मे.टन आवंटन नाशिक जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे.  दि. 27 मे 2024 अखेर जिल्ह्यात युरिया खत 55 हजार 372 मे.टन, डीएपी 11 हजार 951 मे.टन, एमओपी 2 हजार 361, एसएसपी 13 हजार 958 मे.टन व संयुक्त खते 83 हजार 386 मे. टन असे एकूण 167028 मे.टन खत उपलब्ध आहे. जिल्ह्यातील किरकोळ खत विक्रेत्यांकडे दैनंदिन उपलब्ध असलेल्या रासायनिक खतांची माहिती कृषिक या मोबाईल अॅपवर चावडी या सदराखाली उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे.  


कृषी विभाग किंवा वजन मापे निरीक्षकांकडे तक्रार करण्याचे आवाहन


कृषी निविष्ठा गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी कराव्यात. निविष्ठा खरेदी करताना सील अथवा मोहोरबंद पाकिटे / पिशव्या / बाटल्या असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी. शेतकरी (Farmers) बांधवांनी परवानाधारक कृषी निविष्ठा केंद्रातूनच व पक्क्या पावतीवरच कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात. तसेच अनुदानित रासायनिक खताची खरेदी ही e-POS मशिनद्वारेच करावी. कमी वजनाच्या निविष्ठा व पाकिटावरच्या छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री करणे तसेच मागणी व्यतिरीक्त इतर निविष्ठांची शेतकऱ्यांना सक्ती करणे हे बेकायदेशीर असून याबाबत कृषि विभागाकडे तसेच वजनेमापे निरीक्षकांकडे तक्रार नोंदवावी. 


17 भरारी पथकांची नियुक्ती


विभाग व जिल्हास्तरावर प्रत्येकी 1 आणि तालुकास्तरावर प्रत्येकी 1 याप्रमाणे एकूण 17 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठाबाबत काही तक्रार असल्यास ७८२१०३२४०८ या भ्रमणध्वनी क्रमांक तसेच जवळच्या कृषि विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहनही कृषि विभागामार्फत (Agriculture Department) करण्यात आले आहे.


आणखी वाचा 


खूशखबर! येत्या 5 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, महाराष्ट्रात कधी बरसणार?