Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. विजय करंजकर यांच्याकडून नाशिक लोकसभेसाठी तयारीही केली जात होती. मात्र ऐनवेळी विजय करंजकर यांचा पत्ता करत सिन्नर माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर केली. यामुळे विजय करंजकर नाराज होते. 


या नाराजीमुळे विजय करंजकर यांनी बंडखोरी करत नाशिक लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. यावेळी माझ्या सोबत भगूर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिकमधील 27 ते 30 नगरसेवक तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य असल्याचा दावा करत त्यांनी ठाकरे गटाला इशारा दिला होता.


विजय करंजकरांना मुख्यमंत्र्यांकडून मोठी जबाबदारी


यानंतर विजय करंजकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Chaudhary) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय करंजकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना उपनेते पद तसेच नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख पद देण्यात आले आहे. विजय करंजकर हे शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेना शिंदे गटाचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


ठाकरे गटाकडून करंजकरांचा खरपूस समाचार


दरम्यान, विजय करंजकर यांना एकनाथ शिंदे यांनी जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवताच शिवसेना ठाकरे गटाने करंजकर यांचा खरपूस समाचार घेतला आहे.  करंजकरांच्या प्रवेशामागे बारगेनिंग झाल्याचा आरोप  ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी केला आहे. तर करंजकर पक्षातून गेल्याचा आनंद झाला आहे. आम्हाला त्यांचा त्रासच होत होता, असे ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी म्हटले आहे. विजय करंजकर पक्षातून गेल्याने कुठलाही फटका बसणार नाही. आमचा विजय निश्चित आहे, असा दावा नाशिकचे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी केला आहे. दरम्यान नाशिक लोकसभेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


नाशिक लोकसभेतून माघारीचा अखेरचा दिवस, शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठामच, महायुतीकडून मनधरणीसाठी जोरदार हालचाली


भुजबळांना उमेदवारी न मिळाल्याने अजित पवार गटातील बडा नेता अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात, गोडसेंच्या अडचणी वाढणार?